कल्याण: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत विविध प्रकारच्या योजना आखल्या आहेत. यामध्ये आता हॉटेल व्यावसायिक देखील सहभागी झाले आहेत. ‘बोटाला मतदान केल्याची शाई दाखवा, आणि १० टक्के डिस्काउंट मिळवा’, अशी योजना कल्याण शहरातील प्रमुख हॉटेल व्यावसायिकांनी तयार केली आहे.
निवडणूक आयोग वेगवेगळ्या जाहिराती, पथनाट्याद्वारे मतदारांमध्ये मतदानासाठी जनजागृती करत आहे. त्यांना या कामात महाविद्यालये, शाळा आणि स्वयंसेवी संस्थादेखील मदत करत आहेत. दरम्यान, शहरातील हॉटेल व्यावसायिकांनी देखील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी पुढाकार घेतला आहे. मतदान करून आलेल्या मतदारांना सोमवार ते बुधवार असे तीन दिवस जेवणार सूट देण्यात आली आहे. कल्याणमधील बहुतांश हॉटेलमध्ये ही सूट उपलब्ध असेल. त्याचबरोबर, शहरामध्ये मिष्टान्नांची विक्री करणाऱ्या काही दुकानांमध्ये देखील खाद्यपदार्थांवर १० ते १५ टक्के सूट देण्यात आली आहे.
उद्या लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यामुळे, नागरिकांना सोमवारपासून बुधवारपर्यंत म्हणजे, तीन दिवस जेवणावर १० टक्के सूट देण्यात येणार आहे. मतदाराने मतदान केल्याची शाई दाखवल्यानंतर त्यांना ही सूट मिळणार आहे. – प्रवीण शेट्टी, अध्यक्ष, हॉटेल व्यावसायिक संघटना, कल्याण.