डोंबिवली : युवा वैभव हरिहरनने सीएच्या परीक्षेत देशातून दुसरा क्रमांक प्राप्त करून डोंबिवलीचे नाव उंचावले होते. आता डोंबिवलीमधील श्रेया महादेव शिंदे हिने डोंबिवलीच्या शीरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. मॉडेल इंग्लिश स्कूलच्या श्रेयाने बर्फावर नॉनस्टॉप तब्बल ४८ मिनिटे ३८ सेकंदात ९२ योगासने करून नवीन जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे. या यशामुळे तिच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.श्रेया दहा वर्षांची असल्यापासून योगाकडे आकर्षित झाली. तसेच तिने अनेक स्पर्धांमधून पदकेही पटकावली असल्याची माहिती मॉडेल शाळेच्या योगाशिक्षका मेघा हर्षद परब यांनी दिली. श्रेयाची आई वंदना शिंदे आणि बहीण श्रुती शिंदे यांनीदेखील विशेष परिश्रम घेऊन् तिच्याकडून सराव करून घेतला आहे. तिच्या विक्रमाची अखिल भारतीय योगा महासंघाने ''योगा रेकॉर्ड बुक''मध्ये नोंद केल्याचे सांगण्यात आले.
बर्फावर केली ४८ मिनिटे नॉनस्टॉप ९२ योगासने
By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 3:29 AM