डोंबिवली - जगण्याचे रंग अनुभवण्याआधीच आयुष्यावर दाटलेली दुःखाची काजळी काही काळापुरती तरी दूर करून आनंदाचे काही क्षण जगावेत, आसपास ओसंडणाऱ्या उत्सवी उत्साहात सहभागी होऊन मनावरची उदासीनता दूर करावी आणि जगण्याची नवी उमेद जिवंत होऊन पुढच्या वाटचालीकरिता आपल्या पावलाखाली प्रकाशवाटा तयार करण्याचा विश्वास निर्माण व्हावा यासाठी ईर्शाळवाडीतील बालकांसमवेत दिवाळीची पहाट साजरी करून एका अनोख्या समाधानाची आगळी अनुभूती आज मिळाली. शेकडो दिव्यांच्या रोषणाईतून उजळणाऱ्या प्रकाशासारखा निखळ आनंद रविवारी त्या बालकांच्या चेहऱ्यांवर उमटला आणि मनात दिवाळीची रंगीबेरंगी रांगोळी उमटली.
आजवर अनेक सामाजिक उपक्रमांत सहभागी होण्याचे भाग्य अनुभवले, पण निरागस मनांवर अकाली दाटलेली दुःखाची काजळी दूर करण्यासाठी दिलाशाची एक हळुवार फुंकर पुरेशी ठरते. आज या अनुभवाचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले. ईर्शाळवाडीतील कुटुंबांच्या पाठीशी पिढ्यांन पिढ्या भक्कमपणे आधारासारखा उभा असलेलाअकडोंगर गेल्या पावसाळ्यात निसर्गकोपामुळे ढासळला आणि या गावातील असंख्य कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. अनेकांच्या डोक्यावरची मायेची सावली हरवली, अनेकांचा आधार गेला. अशा अभागी जीवांच्या आयुष्यात नवी उभारी भरण्यासाठी त्यांना आश्वस्त आधाराची किती गरज आहे, हे आज त्यांच्या सहवासात साजऱ्या केलेल्या सणाच्या उत्साहातून अनुभवले.
इर्शाळवाडीत आज उपस्थित राहत तेथील बालकांसमवेत दिवाळी सण साजरा केला. त्यांचा सोबत हितगुज करत फराळाचा आस्वाद घेतला तसेच लहानग्यांच्या आग्रहास्तव त्यांच्या समवेत फटाकेही फोडले. सर्वांना दिवाळी निमित्त आनंदाच्या शिदोरीचे वाटप केले. या दुर्घटनेने कुटंब छत्र हरपलेल्या बालकांचा आधार बनून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. या बालकांच्या शिक्षणाचा सर्व खर्च शिवसेनेच्या आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून उचलण्यात आला आहे. यंदाची दिवाळी जरी या नागरिकांची तात्पुरत्या निवाऱ्यात साजरी होत असली तर पुढील दिवाळी ही त्यांच्या हक्काच्या घरात साजरी होईल अशी ग्वाही यावेळी त्यांना दिली. आजची ही विशेष दिवाळी साजरी करताना ईर्शाळवाडीतील या मुलांच्या मुखावर उमटलेले आनंदाचे हास्य कायम रहावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळाली, हीच दिवाळीने मला दिलेली भेट आहे असे मी मानतो असे कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेश कदम म्हणाले.