कल्याण : कल्याण ग्रामीण भागातील खोणी सकाळी गावाजवळ भल्यामोठ्या गव्याचे दर्शन ग्रामस्थांना झाले. नंतर तो आता अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ परिसरात गवा पाहायला मिळाला आहे. त्यानंतर त्याच्यावर लक्ष ठेवण्यात आले आणि सर्व जण त्याचा शोध घेऊ लागले.. अखेर तो पुढे आणि सर्व जण मागे...पाच किलोमीटरपर्यंत त्याचा पाठलाग करण्यात आला. अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता घेण्यात आली. नेमका काय आहे हा प्रकार जाणून घ्या सविस्तर...
गेल्या 2 -3 दिवसांपासून खोणी परीसरात रानगव्याचे दर्शन झालं होतं. त्यानंतर बुधवारी 18 जानेवारीला हा रानगवा मांगरूळ येथे दिसून आला. मांगरुळ येथील वनक्षेत्रात तो मुक्तविहार करत होता. स्थानिकांच्या लक्षात ही बाब आली आणि त्यांनी वनविभागाला माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी रेस्क्यू टीमसह तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले. हा रानगवा पुढे वाट काढण्याचा प्रयत्न करत होता, मात्र रोपवणास लोखंडी कुंपण असल्याने त्याला बाहेर पडता येत नव्हते. वन अधिका-यांच्या ही बाब लक्षात आली.
सर्व पथक पूर्ण दिवसभर रानगव्याच्या हालचालींवर संयमाने लक्ष ठेऊन होते. रानगवा लोकवस्तीच्या दिशेने बाहेर पडला असता तर तो गोंधळून बिथरण्याची शक्यता होती. अडकून पडलेल्या रानगव्याला मोकळ्या वनक्षेत्राचे दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी वनाधिकारी वैभव वाळिंबे यांचे नेतृत्वाखाली रेस्क्यू टीमने अॅक्शन प्लॅन तयार केला. जाळीच्या कुंपणाची एक बाजू पद्धतशीरपणे उघड्ण्यात आली. त्याला जंगल क्षेत्राच्या दिशेने कुंपणाबाहेर काढून ठरल्याप्रमाणे मार्गक्रमीत करून देण्यास अखेर वनविभागास यश आले आहे.