कल्याण : नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यावर कल्याण डोंबिवली प्रशासनाकडून कोणते ठोस पाऊल उचलले जात नसल्याने आज जागरुक नागरीक फाऊंडेशनच्या वतीने महापालिका मुख्यालयासमोर मूक धरणे आंदोलन केले.
फाऊंडेशनचे प्रमुख श्रीनिवास घाणेकर यांच्यासह पदाधिकारी चेतना रामचंद्रन, मनसेचे महेंद्र कुंदे, आपचे धनंजय जोगदंड, माजी नगरसेवक उमेश बोरगांवकर आदींनी मूक धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत हे आंदोलन केले गेले. फाऊंडेशनच्या वतीने डिसेंबर महिन्यात महापालिका मुख्यालयासमोर सलग आठ दिवस बेमुदत धरणे आंदोलन केले गेले. त्यानंतर महापलिकेच्यावतीने अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी नागरीकांच्या विविध प्रश्नावर तोडगा काढण्याकरीता लेखी आश्वासन दिले गेले. त्यानंतर धरणे आंदोलन मागे घेतले गेले होते.
पंधरा दिवसात संबंधित विभागानी अहवाल सादर करण्याचे आदेश चितळे यांनी दिले होते. हे आश्वासन २९ डिसेंबर रोजी दिले होते. डिसेंबरपासून पंधरा दिवसाची मुदत १२ जानेवारीला संपुष्टात आली. त्यानंतरही अहवाल देण्याची कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आजपासून फाऊंडेशने पुन्हा दररोज ३ ते ५ या कार्यालयीन वेळेत मूक धरणे आंदोलन सुरु केले आहे. २६ जानेवारीनंतर हे आंदोलन सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत केले जाणार आहे, असे घाणेकर यांनी सांगितले.