कल्याण : कोरोनामुळे केडीएमसीची निवडणूक लांबणीवर पडली असली तरी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पक्षवाढीसाठी जोमाने कामाला लागा, अशा सूचना केल्या. सन्मानपूर्वक जागावाटप झाले तर मनपा निवडणूक महाविकास आघाडीतून लढू अन्यथा स्वबळावर लढण्यासाठीही सज्ज राहा, असेही त्यांनी सांगितले.
केडीएमसीची निवडणूक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार होती. परंतु, कोरोनामुळे निवडणूक लांबणीवर पडली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याने निवडणूक कधी होईल, याबाबत साशंकता आहे. दरम्यान, यापूर्वी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० मध्ये मुंबईत काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठक झाली होती. यावर पक्षाचे कोकण विभाग प्रभारी बी. एन. संदीप यांनी वॉर्डनिहाय वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करा, अशी सूचना जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांना केल्या होत्या. त्याप्रमाणे अहवालही सादर करण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबईतील राजीव गांधी भवनमध्ये बुधवारी पटोले यांनी बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रत्येकाला मत मांडण्याची संधी देण्यात आली. स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद कमकुवत आहे, त्यामुळे स्थानिक समस्यांवर भर देत जनसंपर्क वाढवा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढविताना जास्तीत जास्त जागा आपल्या वाट्याला आल्या पाहिजेत, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. यावर सन्मानपूर्वक जागा मिळाल्याच पाहिजेत, अन्यथा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला जाईल, याकडे पटोले यांनी लक्ष वेधले.