कल्याण - भारतीय राष्ट्रध्वजाचा सन्मान राखला जावा. सगळीकडे राष्ट्रध्वज उभारला जावा या उद्देशाने प्रेरित होऊन गेल्या सहा वर्षापासून डीके फ्लॅग फाऊंडेशन कार्य करीत आहेत. दिल्ली हे फ्लॅग स्टेट म्हणून घोषित झाले आहे. महाराष्ट्रही प्लॅग स्टेट होऊ शकते. त्यासाठी राज्यातील आमदारांनी पुढाकार घेण्याचे आवाहन फ्लॅग फाऊंडेशनचे अध्यक्ष राकेश बक्षी यांनी केले आहे.
राकेश बक्षी हे एक यशस्वी उद्योजक आहे. त्याच बरोबर प्रखर देशभक्त आहेत. त्यांचे कुटुंब हे भारतीय सैन्यात होते. त्यामुळे त्यांच्यावर लहानपणापासून देशभक्तीचे संस्कार झालेले आहे. देशासाठी काही तरी वेगळे करण्याची त्यांच्याकडे उर्मी आहे. याच हेतूने प्रेरित होऊन त्यांनी डीके फ्लॅग फाऊंडेशन 2014 मध्ये स्थापन केले. या फाऊंडेशनच्या माध्यमातून सगळ्य़ात प्रथम 2015 मध्ये त्यांनी अंबरनाथ येथे हुतात्मा चौकात शंभर फूटी उंच राष्ट्रध्वज उभारला. हा त्यांचा पहिला प्रयत्न होता. त्याला यश आले. फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी ही मोहीम सुरु केली. अंबरनाथ पाठोपाठ त्यांच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून मुंबई विद्यापीठ, गव्हर्नर हाऊस, माजीवाडा ठाणो, हिरानंदानी सोसायटी, हज हाऊस, कजर्त, रत्नागिरी, राज्य राखीव पोलिस दलाच्या हेडक्वार्टर याठिकाणी शंभर फूटी राष्ट्रध्वज उभारला आहे.
नुकताच सातारा येथे मंत्री शंभूराजे देसाई यांच्या पुढाकारने राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शंभर फुटी राष्ट्रध्वज उभारला आहे. राज्यात दहा ठिकाणी शंभर फूटी राष्ट्रध्वज उभारला आहे. फाऊंडेशनने स्वखर्चातून ही मोहिम सुरु केली असली तरी राज्यातील प्रत्येक आमदाराने त्यांच्या विधानसभा मतदार संघात अथवा खासदाराने त्यांच्या लोकसभा मतदार संघात शंभर फूटी राष्ट्रध्वज उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन फ्लॅग फाऊंडशनचे प्रमुख बक्षी यांनी केले आहे. सध्या देशात दिल्ली हे राज्य फ्लॅग स्टेट आहे. फ्लॅग फाऊंडेशनने केलेल्या आवाहनाला लोकप्रतिनिधींनी प्रतिसाद दिल्यास महाराष्ट्रही फ्लॅग स्टेट होऊ शकते असा विश्वास बक्षी यांनी व्यक्त केला आहे.