कल्याण : सरकारचे प्रतिनिधी हे पोलिस आहेत त्यांनी आंदोलन न छेडण्याबाबत नोटीसा बजावल्या आहेत. पोलिस देखील आरक्षणाच्या बाजूने नाहीत ते सरकारच्या बाजूने असल्याने त्यांनी नोटीस बजावण्याचे धाडस केेले आहे. मराठा मुख्यमंत्री असताना मराठयांना नोटीसा देत असतील तर असे मराठा मुख्यमंत्री देखील आम्हाला नकोत. सरकारने लवकरात लवकर आरक्षण घोषित केले नाही तर मी शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देणार असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे नेते तथा शिंदे गटाचे कल्याणचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी दिला आहे.
मराठा आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी छेडलेल्या उपोषणाच्या निषेधार्थ शुक्रवारपासून मराठा समाजाने कल्याण तहसिल कार्यालयाच्या समोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. यात शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मोरे हे देखील सहभागी झाले आहेत. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला. जरांगे पाटील यांनी सरकारला ४० दिवसांची मुदत दिली होती. ती मुदत संपल्यानंतर पुन्हा ते आमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कल्याणमधील मराठा समाजाने साखळी उपोषण छेडले आहे. जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या केल्या आहेत त्या मान्य करा. सरकार जरी आमचे असलेतरी सरकारसुध्दा आरक्षणाच्या बाजुने आहे तसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले आहे. त्यामुळे आम्हाला आरक्षण भेटले पाहिजे. सरकारने जर लवकरात लवकर आरक्षण घोषित केले नाही तर मी कल्याण जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देणार असल्याचे मोरे यांनी यावेळी जाहिर केले.
मुख्यमंत्र्यांना डोक्यावर घेऊन नाचू
दरम्यान साखळी उपोषणाला परवानगी नाकारत पोलिसांनी मराठा समाजाच्या प्रतिनिधींना नोटीस बजावली आहे. तहसिलदारांना आपल्या मागण्यांचे निवेदन दयावे उपोषण करू नये, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपल्यावर कारवाई केली जाईल असे नोटीशीत नमूद केेले आहे. यावर आमचे उपोषण शांततेत चालू असताना ही दडपशाही कशासाठी असा सवाल मोरे यांनी केला आहे. मराठा मुख्यमंत्री असताना मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांना नोटीस बजावल्या जात असतील तर मराठा मुख्यमंत्री आम्हाला नको असे मोरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी जर आरक्षण दिले तर आम्ही त्यांना पुढील २५ वर्षे मुख्यमंत्री करू आणि डोक्यावर घेऊन नाचू असेही मोरे म्हणाले.