डोंबिवली: रस्त्यावर वाहने चालवताना नियम पाळले जावेत असे सर्रासपणे सांगितले जाते. परंतू उपलब्ध होणारे रस्ते एकीकडे सुस्थितीत नसताना, त्यावर टाकले जाणारे ‘स्पीडब्रेकर’ नियमानुसार टाकले जातात का? हा देखील सवाल आहे. वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी तसेच वाहनचालकांना शिस्त लागण्यासाठी टाकल्या जाणा-या ‘स्पीडब्रेकर’ साठी इंडियन रोड काँग्रेस (आयआरसी) ने काही निकष निर्धारित केले आहेत. परंतू त्याला तिलांजली दिली गेल्याने स्पीडब्रेकर शिस्तीपेक्षा अधिक त्रासदायक ठरत असल्याचे चित्र शहरात ठिकठिकाणी पाहायला मिळते.
शहरातील बहुतांश रस्त्यांवर स्पीडब्रेकर उभारण्यात आले आहेत. पण एकाही रस्त्यावर एकसारखे स्पीडब्रेकर कुठेच पाहायला मिळत नाहीत. ही इथली खासियत आहे. कमी रूंद आणि अधिक उंचीचे गतिरोधक चारचाकी वाहनांसाठी अडचणीचे ठरत आहेत. त्याच्यावरून जाताना चारचाकींचा खालील भाग स्पीडब्रेकरला घासतो. तसेच स्पीडब्रेकरवर पाढरे पट्टे मारणे आवश्यक आहे. परंतू ब-याच ठिकाणी ते मारलेले नाहीत तर काही ठिकाणी पट्टे मारलेले दिसतही नाहीत अशा पध्दतीने कामे केली गेली आहेत.
याचा ताजा नमुना ठाकुर्लीतील ९० फिट रोड, रेल्वे समांतर रस्ता, खंबाळपाडा न्यू कल्याण रोडवर नुकत्याच टाकलेल्या स्पीडब्रेकरच्या ठिकाणी पाहायला मिळतो. विशेष बाब म्हणजे स्पीडब्रेकरच्या आधी काही अंतरावर ‘पुढे गतिरोधक आहे’ असा सूचना देणारा बोर्ड अथवा पाटी हवी पण त्याकडेही दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे अंदाज येत नाही आणि अचानक समोर आलेल्या स्पीडब्रेकरवरून वाहन गेल्यावर जोराने आदळून अपघात होत आहेत. विशेष करून दुचाकीस्वारांना याचा अधिक त्रास होत आहे.