पंकज पाटील, अंबरनाथ: राजकारणात आमदार खासदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असे सगळेच येतात. त्यात आम्ही देखील आहोत मात्र राजकीय अधिष्ठानापेक्षा अध्यात्मिक अधिष्ठान हे आजही आमच्यासाठी श्रेष्ठ असून त्या अधिष्ठानाचा आम्ही आदर करतो असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
ठाणे - रायगड जिल्ह्यातील वारकरी आणि भागवत संप्रदायांतर्फे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने श्री मलंगगडाच्या पायथ्याशी आयोजित राज्यस्तरीय श्री मलंगगड अखंड हरिनाम सप्ताहाची सुरूवात झाली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. टाळ- मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांच्या दिंडीला सुरूवात झाली. दिंडीमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी सहभाग घेतला. टाळ आणि हरिनामाचा गजर करत त्यांनीही दिंडीमध्ये सहभागी होत वारकऱ्यांचा उत्साह वाढवला. राज्यस्तरीय हरिनाम सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसोबत आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री, विश्वनाथ वारींगे महाराज, चेतन महाराज, दिगंबर शिवनारायण जी, विष्णूदादा मंगरुळकर, संतोष चांगो देशेकर, गोपाळ जी, शंकर गायकर, दिनेश देशमुख यांच्यासह अनेक साधू महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री मलंगडाबाबतची लोकभावना पूर्ण करणार
धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेली मलंगड मुक्तीचे आंदोलनाचे आम्ही साक्षीदार असून श्री मलंगडा बाबतची लोकभावना आमच्या लक्षात असून काही गोष्टी आपण जाहीरपणे सांगू शकत नाही. मात्र आपल्या सर्वांच्या मनात असणारी मलंगगड मुक्तीची भावना पूर्ण केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी दिली.
रिंगण सोहळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
या हरिनाम सप्ताहातील उद्घाटन समारंभात मुख्य आकर्षण ठरला तो भव्य असा रिंगण सोहळा. अक्षरशः पंढरपूरप्रमाणे साजऱ्या झालेल्या या रिंगण सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हाती टाळ घेत भान हरपून सहभागी झाल्याचे दिसून आले. यावेळी हेलिकॉप्टरमधून रिंगण सोहळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांच्या हाती भागवत धर्माची पताका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना या रिंगण सोहळ्यात भागवत धर्माची पताका घेऊन रिंगण सोहळ्यातील ज्ञानेश्वर माऊलींच्या अश्वापुढे धावण्याचा मान मिळाला.