मुरलीधर भवारलोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याणलोकसभा मतदारसंघात महायुतीकडून कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रचार सुरू केला असला व खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली असली, तरी शिंदेसेनेने त्यांची उमेदवारी अधिकृत जाहीर केलेली नाही. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांची उमेदवारी घोषित झाली. भाजपची साथ शिंदे यांना कशी मिळते, याकडे लक्ष आहे तर उद्धवसेनेतील एका गटाची नाराजी दरेकर यांच्या मार्गात अडथळा ठरत आहे.
कल्याण लाेकसभा मतदारसंघातील मतदान २० मे रोजी आहे. त्याला अजून बराच वेळ असल्याने शिंदे आणि दरेकर यांनी प्रचारफेऱ्या, सभा असा जाहीर प्रचार अजून सुरू केलेला नाही. दोन्ही उमेदवार सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक संस्थांच्या कार्यक्रमांना हजेरी लावून जनसंपर्क करत आहेत. श्रीकांत यांनी २०१४ च्या निवडणुकीत चार लाख ४० हजार मते मिळवली तर २०१९ च्या निवडणुकीत पाच लाख ५९ हजार मते मिळवली. त्यांच्याविरोधात अनुक्रमे आनंद परांजपे व बाबाजी पाटील हे उमेदवार होते. त्यांना अनुक्रमे एक लाख ९० हजार व दोन लाख १५ हजार मते मिळाली होती.
कल्याण पूर्वेतील भाजपमधील नाराजी आटोक्यात आणण्त्साठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बरेच प्रयत्न केले असून, त्याला यश आले आहे. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना योग्य तो संदेश दिला गेला आहे. डोंबिवली व अन्य भागांतून शिंदेसेनेला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
दरेकर यांनी २००९ मध्ये मनसेतर्फे निवडणूक लढवली होती. त्यावेळी आनंद परांजपे यांच्याशी त्यांची लढत होती. दरेकर यांना एक लाख दोन हजार मते मिळाली होती व त्या तिसऱ्या क्रमांकावर होत्या. शरद पवार गटाची लाखभर मते आपल्याकडे वळवण्यात दरेकर यांना कितपत यश येते, त्यावर त्यांचे मतांचे गणित अवलंबून आहे. मात्र पवार गट किती सहकार्य करेल हा प्रश्नच आहे.