कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी हाती घेतलेल्या रिंगरोड प्रकल्पाच्या दुर्गाडी ते टिटवाळादरम्यानचे काम येत्या पावसाळ्य़ापूर्वी पूर्ण केले जाईल, अशी माहिती केडीएमसीचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.सूर्यवंशी यांनी एमएमआरडीएचे अधिकारी जयवंत ढाणे, सहायक संचालक नगररचनाकार मा. द. राठोड, शहर अभियंत्या सपना देवपनपल्ली-कोळी यांच्यासमवेत प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. यावेळी प्रकल्पाच्या कामातील अडचणी सूर्यवंशी यांनी जाणून घेतल्या.दुर्गाडी ते टिटवाळादरम्यानचा रिंगरोड प्रकल्पाचा टप्पा पावसाळ्य़ापूर्वी पूर्ण केला जाईल, तसेच डोंबिवलीतील कोपर उड्डाणपूल आणि आंबिवली येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. पत्रीपुलाच्या पोहोच रस्त्याचे काम प्रगतिपथावर असून, हे कामही लवकर पूर्ण केले जाणार आहे. सध्या दुर्गाडी खाडी पुलावरील सहा पदरी पुलाचे काम सुरू आहे. त्याच्या तीन मार्गिका पावसाळ्यापूर्वी वाहतूकीसाठी खुल्या केल्या जातील. या पुलांसह रिंगरोडच्या कामाची आता गती दिल्याचे सूर्यवंशी यांनी यावेळी स्पष्ट केले.‘पर्यावरणपूरक कामावर भर’ढाणे यांनी सांगितले की, ‘काही ठिकाणी प्रकल्पासाठी ३५ मीटर रुंदी हवी आहे. तेथे १० मीटरच रस्ता कामाकरिता उपलब्ध आहे. त्यात काय अडचणी आहे, असे किती स्पॉट आहेत. हे जाणून घेतले. रिंगरोड हा उत्तम टिकावा, यासाठी काम कशा पद्धतीने केले जात आहे, त्याची माहिती दिली गेली. रिंगच्या बाजूला उल्हास नदी असल्याने या रस्त्यासाठी मातीचा भराव टाकून रस्ता केला आहे. रस्त्यावर पाणी येऊ नये, तसेच रस्त्याच्या बाजूला पाणी साठले, तरी त्याचा निचरा व्हावा, याची काळजी घेतली आहे. पर्यावरणपूरक काम करण्याचा प्रयत्न केला आहे.’
दुर्गाडी ते टिटवाळा टप्पा होणार पावसाळ्यापूर्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 12:43 AM