अनिकेत घमंडी, डोंबिवली: रेल्वेतून पडून अथवा रेल्वे रूळ ओलांडताना अपघाती मृत्यू झालेले किंवा रस्ते अपघात, आत्महत्या आदी कारणांमुळे मयतांचे पोस्टमार्टेम कक्ष शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये तयार असून तो का तात्काळ सुरू करत नाहीत, संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याची तातडीने दखल घ्यावी आणि तो विभाग तातडीने जनसेवेसाठी सुरू करावा असे ट्विट मनसे आमदार राजू पाटील यांनी केले आहे. निदान या नाजूक विषयावर तरी आम्हाला आंदोलन करायला लावू नका असे पाटील म्हणाले.
कल्याण डोंबिवलीमधील सगळीच प्रकल्प अंतिम टप्प्यात आलेली असून तो टप्पा का पूर्ण केला जात नाही. कोणाचा लाल सिग्नल येतोय, की या संवेदनशील विषयाचा सुद्धा इव्हेंट करायचा आहे का असा खोचक सवाल पाटील यांनी कोणाचेही नाव न घेता केला. ही सुविधा मिळत नाही ही इथल्या नागरिकांची शोकांतिका असून त्यांचे दुःख महापालिका जाणू शकत नाही. मनपाच्या शास्त्रीनगरमध्ये अद्ययावत शवागर सुविधा असून ती टाळेबंद अवस्थेत आहे. त्याची पाहणी लवकरच करणार असून त्यात नेमका काय अडथळा आहे? आयुक्त इंदूराणी जाखड या प्रचंड कार्यशील असून त्या देखील एक एमबीबीएस पदवी असलेल्या डॉक्टर आहेत. त्यांना पोस्टमार्टेमची गरज निश्चितच समजू शकेल, त्या ही अडचण समजून घेतील आणि लवकरच निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डोंबिवली रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक आहे, या ठिकाणी रेल्वे अपघात वाढले आहेत, दैनंदिन घटना घडतात त्यात काही जखमी तर काही मृत्यू होतात, ज्यांचे मृत्यू होतात त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेणे, पोस्टमार्टेम करायला कल्याणला घेऊन जाणे यात पोलीस यंत्रणेचा भरपूर वेळ जातो. तीच अवस्था अपघात झाला त्यात मृत्यू।झाला, आत्महत्या केल्यास अशांच्या नातेवाईकांना, विष्णूनगर, रामनगर, मानपाडा, टिळकनगर पोलीस ठाण्याच्या यंत्रणेला त्रास होतो. याची दखल घेऊन जे तयार झाले आहे ते सुरू करावे.
लोकमत सारखे वृत्तपत्र सामाजिक बांधिलकी ठेवून सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी वृत्तपत्राद्वारे ते मांडत आहे. निदान त्यामुळे प्रकल्प आहेत, लोकार्पण करायला सत्ताधारी, महापालिका प्रशासनाला वेळ नाही हे उघड होते, तसेच जर काही शासकीय अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी झोपेचे सोंग घेतलेल्याना जागे करण्याचे काम लोकमत करत आहे याचे निश्चित समाधान असल्याचे राजू पाटील म्हणाले.