मुरलीधर भवार, कल्याण : नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी आयुक्त डॉ.इंदूराणी जाखड यांच्या हस्ते उंबर्डे घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी वृक्षारोपण करुन नव वर्षाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी कल्याण डोंबिवलीत हरीत क्रांती करण्यासाठी नागरीकांनीही सहकार्य करो असे आवाहन आयुक्त जाखड यांनी केले.
ऊंबर्डे प्रकल्पात चांगल्या प्रकारच्या टेक्नोलॉजीचा वापर करुन विस्तृत प्लॅन करुन हा प्रकल्प चांगल्या प्रकारे राबविता येईल, यासाठी नियोजन सुरु असल्याची माहिती आयुक्तांनी यावेळी दिली. डोंबिवली येथे कच-यासाठी १०० टिपीडी (१०० टन प्रतिदिन) प्लॅन्टचे बांधकाम सुरू आहे. तिथे आपण विन्ड्रो कंम्पोस्टींग करणार आहोत. त्याचे काम मार्च अखेरीस पूर्णत्वास येईल. डोंबिवलीतील कच-याची विल्हेवाट स्थानिक पातळीवर लावता येवू शकेल कल्याणमधील ऊंबर्डे येथील प्रकल्पावर तयार होणारे खत हे विनामुल्य स्वरुपात बचत गटांना देण्यात येणार आहे. त्यामुळे या खताच्या विक्रीतून महिला बचत गटांचे सक्षमीकरण होईल. सेंद्रिय शेतीचे संवर्धन करण्यासही मदत होईल असे आयुक्तांनी सांगितले.
या प्रसंगी महापालिकेचे स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँन्ड ॲम्बेसिडर डॉ.प्रशांत पाटील, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव, माजी स्थानिक नगरसेवक जयवंत भोईर, कार्यकारी अभियंता अनंत मादगुंडी, घन:श्याम नवांगुळ आदी उपस्थित होते.
मेसर्स विकास असोसिएट्स व त्रिवेणी असोसिएट्स यांचेमार्फत प्राप्त होणा-या सुमारे ४०० कोनोकार्पस या सदाहरित दाट प्रजातीच्या झाडांची लागवड ऊंबर्डे येथील घनकचरा प्रकल्पाच्या सभोवताली हरित भिंत करण्यात येणार आहे. हरित भिंतीची देखभाल, दुरुस्ती उंबर्डे घनकचरा प्रकल्प विभागामार्फत केली जाणार आहे. या झाडांच्या लागवडीमुळे या घनकचरा प्रकल्पा भोवती हरित भिंतीचे आच्छादन तयार होईल. त्यामुळे या परिसरातील प्रदुषण कमी होवून पर्यावरणयुक्त वातावरण तयार होण्यास मदत होणार आहे.