कल्याण - कल्याण-मुरबाड-माळशेज रेल्वे मार्गासाठी लागणारा राज्य सरकारचा अर्थिक भार उचलण्यास राज्य सरकार तयार असल्याचे राज्याचे अर्थ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल सादर केलेल्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात आश्वासीत केले आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी आज दिली. अर्थ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी अभिनंदन केले आहे.
कल्याण-मुररबाड-माळशेल या रेल्वे मार्ग प्रकल्प हा 45 वर्षापासून रखडला आहे. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यासाठी राष्ट्रवादीने कल्याणमध्ये कल्याण-नगर रेल्वे मार्गासाठी परिषदही घेतली होती. ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री होत्या तेव्हापासून हा पाठपुरावा सुरु आहे. कल्याण मुरबाड रेल्वे मार्गाचा कामाचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते मुंबईत ऑनलाईनद्वारे करण्यात आले होते. भूमीपूजन होऊन 3 वर्षे उलटून गेली तरी या प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम सुरु झालेले नाही. मात्र राष्ट्रवादीच्या पाठपुराव्याची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थ संकल्प सादर केला. या अर्थ संकल्पात त्यांनी कल्याण मुरबाड मालशेज रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार आर्थिक भार उचलण्यास तयार असल्याचे आश्वासीत केले असल्याची माहिती प्रमोद हिंदूराव यांनी दिली आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी किमान दोन हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. रेल्वे प्रकल्पाचा राज्य आणि केंद्र सरकार अर्धा खर्च उचलते. त्यानुसार राज्य सरकारचा आर्थिक भार उचलण्याचे प्रस्तावित करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले आहे.
कल्याण मुरबाड रेल्वे मार्गाचे काम मार्गी लागल्यास मुरबाड नगरहून येणारा शेतमाल कल्याण बाजारपेठेत वेळेत पोहचविणे शक्य होईल. रेल्वेचा प्रवास स्वस्त असतो. त्याचबरोबर या भागातील विद्यार्थ्यांना कल्याणमध्ये शिक्षणासाठी येण्यासाठी सोय होईल या विविध गोष्टींंचा फायदा नागरिकांना होणार असून, कल्याण मुरबाड नगर हे रेल्वेने जोडले जाईल असे हिंदूराव यांनी सांगितले.