कल्याण - मुंबईतील साकीनाका बलात्कारापेक्षा डोंबिवलीतील तरुणीवरील सामूहिक बलात्काराचे प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांना राज्य सरकारने 20 लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आज येथे दिली. (The state government should help Rs 20 lakh to the families of rape victims in Dombivli; says ramdas athawale)
केंद्रीय मंत्री आठवले यांनी आज डोंबिवली बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यानंतर त्यांनी ही माहिती दिली. मंत्री आठवले यांनी पीडितेच्या कुटुंबियांना 1 लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश दिला आहे. डोंबिवलीतील नागरीकांनी पुढे येऊन या पीडितेच्या कुटुंबांला आर्थिक मदत करावी, असे आवाहन आठवले यांनी यावेळी केले. याचबरोबर, सरकारकडून पीडितेच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. मात्र साकीनाका प्रकरणापेक्षा हे प्रकरण गंभीर असल्याने या प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबाला साकीनाका प्रकरणाप्रमाणेच 20 लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने करावी.
दिल्लीत झालेल्या निर्भया प्रकरणाच्यावेळी मी संसदेत होतो. अशा गंभीर स्वरुपाच्या बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, असा कायदा केंद्र सरकारने केला आहे. या प्रकरणातील 33 आरोपीना फाशीची शिक्षा व्हावी. येत्या सहा महिन्यात हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवून आरोपींना शिक्षा दिली जावी. या घटनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या वतीने निषेध करतो, असे मंत्री आठवले यांनी यांनी म्हटले आहे.