नितीन पंडित
भिवंडी : दहीहंडी उत्सव गुरुवारी शहरात मोठ्या आनंदाने उत्साहात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी लावलेल्या भव्य दहीहंड्यांमध्ये गोविंदा पथकांनी सहभाग नोंदवत ढक्कुमाकूम ढक्कुमाकूंच्या तालावर थरांवर थर रचत सलाम्या दिल्या. शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने व कपिल पाटील फाउंडेशन तसेच भाजपच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांच्या वतीने भादवड नाका येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
शिंदे गटाचे शहर प्रमुख सुभाष माने व कार्यकर्त्यांच्या वतीने महापालिका मुख्यालयासमोर असलेल्या स्व.धर्मवीर आनंद दिघे चौकात धर्मवीर दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष डि के म्हात्रे यांच्या वतीने अंजुर फाटा येथील महावीर चौकात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या डी वाय फाउंडेशनच्या वतीने ग्रामीण भागातील बापगाव नाका येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तर भाजपचे माजी नगरसेवक तथा मनपाचे माजी विरोधी पक्षनेते यशवंत टावरे यांच्या वतीने भंडारी चौकात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या दहीहंडी उत्सवात लाखो रुपयांच्या बक्षिसांची उधळण गोविंदा पथकांवर करण्यात आली.गुरुवारी पहाटेपासून शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती.मात्र भर पावसातही गोविंद पथकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता व ढाकूमाकूम ढाकूमाकून म्हणत गोविंदा पथकांनी थरारक थर लावत सलाम्या दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज चौकात कपिल पाटील फाउंडेशन च्या वतीने आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात २५ लाखांची बक्षिसे असल्याने शहरातील सर्वच गोविंदा पथकांनी कपिल पाटील फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवात हजेरी लावली होती.बाल गोविंदांबरोबरच साई लीला व युवराष्ट्र या महिला गोविंदादांनी पाच थर लावत याठिकाणी सलामी दिली. या ठिकाणी गोविंदा पथकांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्यात आले होत,हेल्मेट व क्रेनला लावलेल्या सौरक्षण पट्टा घालूनच सलामी देण्याऱ्या गोविंदांना थर लावण्याची परवानगी देण्यात येत होती.तर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ऑर्केस्ट्रा,डीजे व नृत्याचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते.तसेच जखमी गोविंदांना तत्काळ वैद्यकीय मदत मिळावी म्हणून रुग्णवाहिका व वैद्यकीय मदत कक्ष ज्यात डॉक्टर नर्स व औषधे ठेवण्यात आली होती.सायंकाळी या दहीहंडी उत्सवास भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी हजेरी लावत भाजप,शिंदे व पवार सरकारचे दहीहंडी उत्सवाला साहसी खेळांचा दर्जा दिल्याने तसेच राज्यात सुट्टी जाहीर केल्याने सरकारचे अभिनंदन करत कपिल पाटील फाउंडेशन च्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मंत्री कपिल पाटील यांनी चित्रा वाघ यांचा सन्मान केला. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.