- प्रशांत माने डोंबिवली - चोरीला गेलेली दुचाकी २४ दिवसांचा कालावधी उलटूनही पोलिसांना सापडलेली नाही. त्यामुळे आता गाडीची चावी आणि मुळ कागदपत्रे देखील घेऊन जा असे आवाहन संतप्त झालेल्या तक्रारदाराने चोरटयाला पोस्टरद्वारे केले आहे. सीसीटिव्ही कॅमेराचे फुटेज देऊन तसेच वारंवार पोलिस ठाण्यात फे-या मारून सुध्दा पोलिसांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने हे पाऊल उचलल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
डोंबिवली पश्चिमेकडील शास्त्रीनगरमधील श्रीकृष्णा सोसायटीत राहणारे अभिषेक मधुकर भंडारे यांची दुचाकी सोसायटीच्या पार्किंगमधून चोरीला गेल्याची घटना १३ सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली. रात्री पार्क केलेली गाडी सकाळी दिसेनाशी झाल्यावर, अभिषेक यांनी आपल्या नातेवाईकांसह परिसरात शोध घेतला. मात्र, गाडी सापडली नाही. अभिषेक यांनी लागलीच विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर शहरातील १५ ते २० ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज देखील त्यांनी पोलिसांना दिले. मात्र तक्रार नोंदवून २४ दिवस उलटून गेले, तरी पोलिसांना दुचाकीचा शोध लावण्यात यश आलेले नाही.
पोलीस ठाण्यात वारंवार फे-या मारूनही गाडीचा थांगपत्ता लावला जात नसल्याने संतप्त झालेल्या अभिषेकने चोराला चक्क गाडीची चावी आणि मूळ कागदपत्रे घेऊन जाण्याचे जाहीर आवाहन पोस्टरद्वारे केले आहे. ‘‘माझी दुचाकी गाडी दिनांक १३ सप्टेंबर २०२४ रोजी चोरीला गेली आहे. आज त्या गोष्टीला २४ दिवस झाले तरीही ती पोलिसांना सापडली नाही. म्हणून मी चोरांना आवाहन करतो की, त्यांनी माझ्या गाडीचे मूळ कागदपत्रं पण घेऊन जावे’’ असे त्यांनी पोस्टरमध्ये नमूद केले आहे.