डोंबिवली: मुंबई शिक्षक मतदारसंघात मतदार नोंदणी सुरू असून, यामध्ये बोगस मतदार नोंदणीस आळा घालण्याची मागणी मुंबई मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष व भाजपा प्रदेश कार्यकारणी निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांनी केली आहे. या बाबत अनिल बोरनारे यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन ही मागणी केली.
मुंबई शिक्षक मतदारसंघात मतदार नोंदणी ६ नोव्हेंबर पर्यंत सुरू असून अनिल बोरनारे हे मुंबईतील शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन शिक्षकांची मतदार नोंदणी करीत आहेत. मतदार नोंदणीसाठी शिक्षक हा मान्यताप्राप्त शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असावा लागतो माध्यमिक, उच्च माध्यमिक, वरिष्ठ महाविद्यालय, डिग्री, डिप्लोमा, आयटीआय, डीएड व बीएड कॉलेज, फार्मसी, अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षक व प्राध्यापक या मध्ये नोंदणी करू शकतात. पण अनेकदा पात्रता नसलेल्यांची नोंदणी देखील केली जाते यावर आळा घालण्याची मागणी अनिल बोरनारे यांनी केली आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांनी मुंबई शिक्षक मतदार संघात मतदार नोंदणी करण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. मुंबई शिक्षक मतदार संघात मतदार नोंदणी करण्यासाठी फॉर्म क्रमांक १९ भरणे अनिवार्य आहे. निवडणूक आयोगामार्फत शिक्षक मतदार संघाची मतदार यादी पुन्हा एकदा नव्याने तयार केली जाणार आहे. आधी नोंदवलेली सर्व नावे रद्द करण्यात आली आहेत. मुंबईत राहणारे माध्यमिक, उच्चमाध्यमिक, महाविद्यालयीन व तंत्रविद्यालये व तत्सम संस्थांचे तसेच विद्यापीठांचे शिक्षक मतदार होऊ शकतात. त्यांची शाळा/कॉलेज किंवा संस्था / वर्क प्लेस त्याच मतदार संघात असण्याची आवश्यकता नाही.
उदा. मुंबई बाहेरील शाळांमध्ये शिकवणारे मात्र मुंबईत राहणारे शिक्षकही मुंबई शिक्षक मतदार संघाचे मतदार होऊ शकतात. शिक्षक मतदार संघाच्या यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी कोणत्याही पूर्णवेळ शिक्षकाला मागणी करता येईल. शिक्षकाची नेमणूक रेग्युलर किंवा ॲडव्हॉक बेसिसवर असेल तरी सुद्धा चालेल. मागील सहा वर्षातील कोणतीही किमान तीन वर्षे ज्यांनी एका शाळेत किंवा एका पेक्षा अधिक शाळेत शिक्षक म्हणून काम केलेले असणे आवश्यक आहे.
अनुदानित किंवा विनाअनुदानित किंवा सेल्फ फायनान्स अशा कोणत्याही शाळेत, शिक्षण संस्थेत, कॉलेजात, ज्युनिअर कॉलेजात, माध्यमिक पेक्षा कमी नसलेल्या कोणत्याही अभ्यासक्रमाच्या संस्थेत काम करणारे शिक्षक मतदार होऊ शकतात. या सर्व नियम निकषानुसार कार्यरत राहणे महत्वाचे असल्याचे सांगण्यात आले.