टिटवाळा : कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कल्याणच्या ग्रामीण क्षेत्रात १० मे ते १४ मेपर्यंत कडक लाॅकडाऊन करण्याबाबत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आदेश जारी केले आहेत. याबाबत कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांनी विनंती केली हाेती.तालुक्याच्या ग्रामीण भागात ४१ ग्रामपंचायती असून, एकूण ७० गावे, पाडे व वाड्या आहेत. तेथे दीड लाखाच्या आसपास लाेकसंख्या आहे. कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी साखळी तोडणे आवश्यक असल्याचे आकडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले होते. त्याची दखल घेत नार्वेकर यांनी कडक लाॅकडाऊन घेण्यासाठीचा आदेश पारित केला आहे.
१० मे ते १४ मेपर्यंत सर्व दुकाने राहणार बंद nकल्याण ग्रामीण (मनपा क्षेत्र वगळून) क्षेत्रातील किराणा, भाजीपाला, फळे, दूध डेअरी, बेकरी, मिठाई व सर्व प्रकारचे अन्नपदार्थ विक्री दुकाने १० मे रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ते १५ मे सकाळी ७ वाजेपर्यंत घरपोच सेवा वगळता सर्व बंद ठेवण्यात येणार आहेत.
nलॉकडाऊन आदेशाचे उल्लंघन केल्यास अथवा विरोध दर्शवल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ५१ ते ६० भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ व भारतीय दंड संहिता १८६० मधील १८८ नुसार दंडनीय, कायदेशीर कारवाई करण्यात येईल.