कल्याण : एका गर्भवती महिलेस नातेवाइकांसह रुग्णालयाबाहेर काढल्याप्रकरणी शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांचा रुग्णालयाचे डॉक्टर अश्वीन कक्कर यांच्याशी वाद झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ एक दिवसाचा बंद रुग्णालये पाळणार होती. मात्र, गायकवाड यांनी माफी मागितल्यानंतर हा वाद संपुष्टात आला असून, इंडियन मेडिकल असोसिएशनने संप मागे घेतल्याचे जाहीर केले आहे.
कल्याण - मुरबाड रोडवर डॉ. कक्कर यांचे वैष्णवी रुग्णालय आहे. या रुग्णालयात द्वारली येथे राहणाऱ्या एका गर्भवती महिलेस प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. तिला भेटण्यासाठी आलेल्या नातेवाइकांना रुग्णालयाने बाहेर थांबण्यास सांगितले. नातेवाईक बाहेर जात नसल्याने डॉक्टरांनी गर्भवती महिलेस बाहेर काढले. हा प्रकार कळताच गायकवाड यांनी डॉक्टरांना जाब विचारला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. गर्भवती महिलेच्या आईने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचाही प्रयत्न केला. न्याय मिळाला नाही, तर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, डॉक्टर कक्कर यांनी त्यांच्याशी गायकवाड यांनी गैरवर्तन केल्याच्या निषेधार्थ रुग्णालय बंद करून रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था महापालिकेने करण्याचा इशारा महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांना दिला होता.
इंडियन मेडिकल असोसिएशनने या प्रकरणात डॉ. कक्कर यांच्या पाठीशी उभे राहून गायकवाड यांनी डॉ. कक्कर यांची माफी मागितली नाही, तर २५ नोव्हेंबर रोजी सर्व रुग्णालये व क्लिनिक्स एक दिवसाचा संप पुकारून काम बंद ठेवतील. त्यातून तोडगा निघाला नाही, तर २८ पासून बेदमुदत बंद पुकारण्याचा इशारा दिला होता. कोरोना काळात रुग्णालये बंद झाल्यास आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे गायकवाड यांनी डॉक्टर कक्कर यांची भेट घेतली. त्यानंतर नगरसेवकाच्या माफीपश्चात उद्याचा संप मागे घेतल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी सांगितले.
गैरसमजुतीतून घडला प्रकार nनगरसेवक महेश गायकवाड यांनी यासंदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून डॉक्टर अश्विन कक्कर व त्यांच्यात झालेला प्रकार हा गैरसमजुतीतून झाला होता, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे २५ नोव्हेंबर रोजीच्या डॉक्टरांच्या एक दिवसीय संपाचे अरिष्ट टळले आहे.