लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: शहराच्या पश्चिम भागातील मुस्लीम बहुल वस्तीतील मौलवी कम्पाउंड येथील अतिधोकादायक इमारतीच्या सज्जाचा काही भाग शनिवारी दुपारी कोसळला. या घटनेत एक मुलगी आणि तिची आई जखमी झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच महापालिका, अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या धोकादायक इमारतीमधील नागरिकांचे अन्य ठिकाणी स्थलांतर केले जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. मौलवी कम्पाउंड ही धोकादायक इमारत आहे.
या इमारतीला पालिकेने यापूर्वीच नोटीस दिली आहे. एक इमारत तळ अधिक चार मजली आहे. तर दुसरी इमारत तळ अधिक एक मजली आहे. या इमारतीत ७५ घरे आहेत. या ठिकाणी बहुतांश रहिवासी भाडेकरू आहेत. दुपारी तळ अधिक चार मजली असलेल्या धोकादायक इमारतीच्या चौथ्या मजल्यावरचा सज्जा कोसळला. इमारतीच्या खालून जात असलेल्या मेहरुनिसा आणि त्यांची मुलगी तस्मिया या जखमी झाल्या. मेहरुनिया या तस्मिया हिला शाळेत घेऊन जात होत्या. तस्मिया हिच्या पायाला, तर मेहरुनिसा हिच्या डोक्याला दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पालिका उपायुक्त धैर्यशील जाधव, कार्यकारी अभियंता जगदीश कोरे, सहायक आयुक्त सविता हिले, प्रीती गाडे, आयुक्तांचे सचिव उमेश यमगर आदींनी त्याठिकाणी धाव घेतली.
संक्रमण शिबिरे नाहीत
गुरुवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे घटना घडली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पावसाळ्यात महापालिका हद्दीतील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतीतील नागरिक जीव मुठीत धरून जगत असतात.
धोकादायक इमारतीमधील नागरिकांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या जातात. मात्र, त्यांची पर्यायी व्यवस्था करण्यासाठीमहापालिकेकडे पुरेशी संक्रमण शिबिरे नाहीत.
उपायुक्त जाधव यांनी सांगितले की, येथील ७५ कुटुंबीयांना अन्य ठिकाणी स्थलांतरीत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.