अनिकेत घमंडी, डोंबिवली: प्रत्येक व्यक्तीमध्ये काही तरी विशेष गुण असतोच. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांना आवडणाऱ्या क्षेत्रात करियरच्या संधी निवडाव्यात, मग तो छंद असला तरिही हरकत नाही, त्याचे व्यवसायात रूपांतर करता यायला हवे, असे उद्गार प्रख्यात न्यूरोसर्जन व टिळकनगर विद्यामंदिर चे माजी गुणवंत विद्यार्थी डॉक्टर उज्वल येवले यांनी काढले. शाळेच्या अमृत पुत्र गौरव समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी टिळक नगर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीकांत पावगी होते. डॉ. येवले यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करताना केवळ वैद्यक किंवा अभियांत्रिकी क्षेत्रामध्येच करिअर न करता तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये उत्तम व्यवसाय संधीचा लाभ घ्या असा सल्ला दिला. कार्यकारी मंडळाच्या सदस्या नितेश्री काबाडी यांनी प्रास्ताविक व स्वागत पर भाषणात मंडळाच्या ६७ वर्षांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला तर उपमुख्याध्यापिका मुग्धा साळुंखे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
पावगी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी पालकांना कायम ठेवीसाठी आवाहन केले. त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून लगेच येवले कुटुंबीयांनीच रुपये २५ हजार रुपयांची देणगी जाहीर केली. पुढे बोलताना पावगी यांनी येवले यांना त्यांच्या शल्य चिकित्सा आणि मेंदूच्या शस्त्रक्रियांवर पुस्तक लिहून प्रकाशित करण्याचा मानस व्यक्त केला. त्या कार्यक्रमात पाचवी ते बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके सन्मानचिन्हे प्रशस्तीपत्रके पुस्तके रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले.