लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण : कल्याणमध्ये भररस्त्यात अलिशान कारच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी करणाऱ्या शुभम मितालिया या तरुणाला बाजारपेठ पोलिसांनी शनिवारी अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे ज्या कारवर बसून शुभम स्टंट करीत होता ती कार एक अल्पवयीन मुलगा चालवित होता. कार या अल्पवयीन मुलाच्या वडिलांची आहे. पुण्यात अगरवाल बिल्डरच्या अल्पवयीन कारचालकाचा ‘प्रताप’ राज्यात चर्चेचा विषय ठरला असताना कल्याणमध्ये ही धक्कादायक घटना घडली.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या समोरून शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास एक आलिशान कार जात होती. तिच्या बोनेटवर एक तरुण पाय पसरून आरामात बसला होता. भररस्त्यात चालत्या कारच्या बोनेटवर तरुण पाय पसरून बसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.
कार मालकाविराेधात गुन्हा दाखल
- बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत या स्टंटबाज तरुणाचा शोध सुरू करून दोघांना ताब्यात घेतले. कारवर बसून स्टंट करणारा शुभम नावाचा तरुण होता. ती कार एक अल्पवयीन मुलगा चालवत होता.
- शुभम हा कल्याण पश्चिमेत राहताे. तर, कारचालक असलेला अल्पवयीन मुलगा कल्याण पूर्वेत राहतो. या दोघांना ताब्यात घेतले असून कारचे मालक असलेल्या वडिलांच्या विरोधात बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.