लोकमत न्यूज नेटवर्क - कल्याण : बारामती मतदारसंघानंतर कल्याण लोकसभेकडे संपूर्ण राज्याचं नाही तर देशाचं लक्ष लागलं आहे. कारण हा मतदारसंघ मुख्यमंत्री पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा आहे. या लोकसभेत शिंदेंविरोधात कोण उमेदवार उभा राहणार? याबाबत अनेक नावं महाविकास आघाडीकडून पुढे आली होती. आता पुन्हा एकदा माजी आमदार सुभाष भोईर यांच नाव चर्चेत आलं आहे. सध्या शिवसेना ठाकरे गटाने सोशल मीडियावर सुभाष भोईर यांचा व्हिडिओ शेयर केला असून त्यात " एन्ट्री दणक्यात होणार" असं म्हटलं गेलं आहे. त्यामुळे कल्याण लोकसभेत माजी आमदार सुभाष भोईर हे श्रीकांत शिंदेंविरोधात मैदानात उतरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
सुभाष भोईर हे कल्याण ग्रामीणचे माजी आमदार आहेत. त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. आगरी समाजाचे असणारे भोईर यांचे मूळ गाव दिवा आहे. ठाणे पालिकेतही त्यांनी 25 वर्ष नेतृत्व केलं आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा असून आगरीबहुल पट्ट्यामध्ये त्यांचे स्नेहसंबंधही चांगले आहेत. सुरुवातीला स्थानिक भूमिपुत्र म्हणून मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेमुळे पाटील यांना माघार घ्यावी लागली. त्याअगोदर सुभाष भोईर यांचे भावी खासदार म्हणून बॅनर देखील लागले होते. मात्र मध्यतरी ते फारसे राजकीय दृष्ट्या सक्रिय नव्हते. आता पुन्हा भोईर समर्थक सक्रिय झाले असून.
कल्याण लोकसभेतून सुभाष भोईर यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी ठाकरे गटाचे कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांना करणार आहेत. इतकंच नाही तर भोईर यांच्या शीळ येथील निवासस्थानी कल्याण लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत बैठकाही झाल्या. यामध्ये भोईर यांनी ही निवडणूक लढवली पाहिजे यावर एकमत झाले. सोशल मीडियावरही सध्या ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणावर भोईर यांचे व्हिडीओ शेयर केले जात आहे. त्यामुळे सुभाष भोईर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले तर ही लढत रंगतदार होऊ शकते