कल्याण : सहायक लोको पायलट असलेल्या सुजित कुमार जयंत यांनी पूर्वेकडील कोळसेवाडी येथील राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून सुजित कुमारने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या सहकाऱ्यांनी केला.
मुंबई लोको पायलट असलेला सुजित कुमार कोळसेवाडी परिसरात राहायला होता. मागील तीन महिन्यांपासून सुजित कुमारची गैरहजेरी लावण्यात लावण्यात आली. तसेच, सप्टेंबर महिन्यापर्यंत त्याला निलंबित करण्यात आले होते. आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. तसेच, सुजित कुमार याची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून छळवणूक सुरु असल्याचा आरोप त्याच्या सहकाऱ्यांकडून करण्यात आला. सुजित कुमारचा मृतदेह रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आला. ही माहिती मिळताच अनेक रेल्वे कर्मचारी रुग्णालयाबाहेर तसेच रेल्वे मोटरमन कार्यालयाबाहेर जमा झाले. यावेळी, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही अशी भूमिका घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सुजितच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे. त्यांची चौकशी देखील करण्यात यावी, त्याचबरोबर कामगारांचे कामाचे तास कमी करावे अशी मागणी करण्यात आल्याचे रनिंग ब्रांच अति. सचिव एससी. एसटी. असोसिएशनचे राहुल गायकवाड यांनी सांगितले.