कल्याण-कल्याणमधील भाजप आणि शिवसेना शिंदे गटात कुरबूरी आहेत. त्या आज समोर आल्या आहेत. कल्याण पूर्व भागातील चक्की नाका परिसरात भाजपचे चिन्ह कमळ भिंतीवर रंगवत असताना भाजपच्या कार्यकर्त्यांना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या समर्थकांनी विरोध केला. त्यांना भाजप कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली आहे. या घटनेनंतर भाजपचे कल्याण पूर्वेचे शहर अध्यक्ष संजय मोरे यांनी शिंदे गटाने त्यांच्या नगरसेवकाच्या समर्थकांना आवरावे अन्यथा आम्ही देखील हात सोडू असा इशारा शिंदे गटाला दिला आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.
राज्यात शिंदे गट आणि भाजप यांच्या नेत्यांकडून युतीत आलबेल असल्याचे सांगितले जाते. कल्याण पूर्व भागात शिंदे गट आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात कुरबूरी सुरु आहेत. कल्याणच्या चक्कीनाका टेकडी परिसरात भाजपच्या कार्यर्त्यांकडून भाजपचे चिन्ह असलेले कमळ भिंतीवर रंगविले जात होते. त्याठिकाणी शिंदे गटाचे माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचे समर्थक आले. त्यांनी त्याठिकाणी भिंतीवर कमळ रंगविण्यास विरोध केला. भाजपच्या तीन ते चार कार्यकर्त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
शिंदे गटाचे नगरसेवक शेट्टी यांच्या सांगण्यावरुनच भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप भाजपचे कल्याण पूर्व शहर अध्यक्ष मोरे यांनी केला आहे. घडल्या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास भाजप कार्यकर्त्यांसह मोरे यांनी धाव घेतली आहे. शिंदे गटाने नगरसेवकाच्या समर्थकांना आवरावे अन्यथा आम्ही हात सोडू असा इशारा शिंदे गटाला दिला आहे.
दरम्यान माजी नगरसेवक शेट्टी यांच्यावर मोरे यांनी केलेल्या आरोपा संर्दभात विचारणा करण्यासाठी शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता ते बाहेर गावी असल्याने त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.
काही दिवसापूर्वी भाजप आणि शिंदे गटात खासदार श्रीकांत शिंदे यांना निवडणूकीत सहकार्य न करण्याच्या मुद्यावरवरुन वाद झाा होता. त्या वादावर दोन्ही पक्षाकडून पडदा टाकण्यात आला आहे. तो वाद संपत नाही. तोच दुसरा वाद या मारहाणीच्या घटनेवरुन समोर आला आहे.