डोंबिवली: उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभेची उमेदवारी माजी नगरसेविका वैशाली दरेकर यांना दिल्याने ठाकरे सेनेतील माजी आमदार सुभाष भोईर समर्थक नाराज झाले असून त्यांनी पक्षाचे सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा दिला. गुरुवारी त्यांनी भोईर यांच्या मुंब्रा येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेत या लोकसभेची उमेदवारी ही भोईर याना मिळायला हवी होती. नाना प्रकारे भोईर यांना राजकीय दबाव आणूनही त्यांनी ठाकरे यांची साथ सोडली नव्हती. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली असती तर महायुतीच्या उमेदवारासमोर काटे की टक्कर झाली असती. दरेकर यांना उमेदवारी देऊन आम्हाला नाराज केल्याचे कार्यकर्त्यांनी भोईर यांना गार्हाणे मांडले. काहीही झाले तरी भूमिपुत्र आणि ठामपात अनेक वर्षे नगरसेवक, सिडकोचे अध्यक्ष, शिवसेनेचे माजी आमदार अशी अनेक पद भोईर यांना मिळाली होती, त्यामुळे लोकसभेची उमेदवारी मिळायला हवी होती, ठाकरे सेनेने त्यांचा विचार करायला हवा होता आदी मुद्यांवर चर्चा झाली.
२०१९च्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे यांनी कल्याण ग्रामीणच्या निवडणूकित शिवसेना उमेदवार म्हणून माजी आमदार भोईर यांना एबी फॉर्म दिला होता. तरीही निवडणूक फॉर्म भरण्याच्या ऐनवेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेत भोईर यांच्या तोंडचा घास काढून घेत ती उमेदवारी ज्येष्ठ माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना दिली होती. तेव्हापासून भोईर हे शिंदे यांच्यापासून दुरावल्याचे सर्वश्रुत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणूकित ठाकरेंनी भोईर यांना उमेदवारी दिली असती तर या ठिकाणी महायुतीसमोर अटीतटीचा सामना झाला असता असे जमलेल्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते.
दरेकर यांना उमेदवारी जाहीर।होताच डोंबिवलीमधील महिला पदाधिकाऱ्यांनीही नाव न छापण्याच्या अटीवर नाराजी व्यक्त करत ज्यांनी ठाकरे सेनेसाठी काहीही योगदान दिले नाही अशांना उमेदवारी दिली तर पक्षाचे काम करण्यापेक्षा घरी बसलेले बरे अशी भावना माध्यमांजवळ व्यक्त केली होती.
तर दुसरीकडे शिंदेसेनेचे पदाधिकारी देखील म्हणतात की, दरेकर यांना उमेदवारी दिली असे म्हणून काही होत नाही, ही कदाचित खेळी असू।शकते. त्यामुळे अंतिम एबी फॉर्म कोण भरतो हे पाहणे औत्सुक्याचे असेल असाही टोला लगावला. त्यामुळे शिंदेसैनिक गाफील नसून सतर्क असल्याचे सांगण्यात आले.
यावर सुभाष भोईर म्हणाले की, श्रीमलंग पट्टा, कल्याण, कल्याण ग्रामीण, डोंबिवली आदी ठिकाणचे ठाकरे सेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी माझ्या भेटीला आले होते. त्यांचे म्हणणे मी ऐकून घेतले, राजीनामा संदर्भात त्यांनी त्यांचा वैयक्तिक निर्णय घ्यावा, त्यावर मी काय भाष्य करणार.