डोंबिवली - ठाकुर्ली चोळेगाव परिसरात राहणारा सुरेंद्र चौधरी उर्फ पाटील याच्याविरोधात पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे. सुरेंद्र विरोधात विविध प्रकारचे सात गुन्हे दाखल आहेत. मानपाडा पोलिस ठाण्यात त्याने अधिका-याच्या खुर्चीत बसून रिल्स बनविल्याप्रकरणी त्याला अटक देखील झाली होती. दरम्यान त्याला ठाणे जिल्हयातून एक वर्षासाठी तडीपारी केल्याची माहीती सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांनी दिली.
बांधकाम व्यावसायिक असलेल्या सुरेंद्रला रील्स बनविण्याचा नाद आहे. फक्त पोलिसांच्या खूर्चीत बसूनच नव्हे तर त्याआधी त्याने चकक हातात बंदूक घेऊन, भरपूर रोकड समोर ठेवूनही रील्स बनवले आहेत. दरम्यान ऑक्टोबरच्या अखेरीस मानपाडा पोलीस ठाण्यात त्याने बनविलेले रील्स त्याला चांगलेच महागात पडले होते. मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्हयातील तक्रारदार म्हणून गेलेल्या सुरेंद्रने कक्षात कोणी नसताना पोलीस अधिका-याच्या खूर्चीवर बसून रील्स बनविला आणि त्याने तो सोशल मीडीयावर व्हायरल देखील केला होता. यात त्याला अटक देखील झाली होती.
सुरेंद्रने या कृत्याबाबत माफी मागून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल केला होता. दरम्यान पोलीस ठाण्यातील अधिका-याच्या कक्षात केलेला रील्स बनविण्याचा गुन्हयाच्या आधी दाखल असलेल्या सात विविध गुन्हयांप्रकरणी त्याच्यावर तडीपारीची कारवाई झाल्याचे पोलिस सांगत असलेतरी सुरेंद्रला पोलीस ठाण्यात रील्स करणे भोवल्याची चर्चा आहे.