कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिकाकडून शहरात स्वच्छ तीर्थथ्भियानाला सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानातर्गंत २१ जानेवारीपर्यंत ४३ मंदिरे आणि परिसरात स्वच्छता अभियान राबविले जणारा आहे. या संदर्भात महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड़ यांच्या आदेशानुसार घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांच्या दालनात सर्व प्रभाग क्षेत्रांचे स्वच्छता अधिकारी आणि कर्मचारी यांची नुकतीच बैठक पार पडली. यामध्ये कल्याण डोंबिवली शहरातील मुख्य ४३ मंदिर मंदिरांचे पोहोच रस्ते आणि मंदिर परिसर स्वच्छता कर्मचारी यांच्यामार्फत साफ करून घेण्याचे आदेश देण्यात आले. त्याचप्रमाणे मंदिराच्या आतील भाग, गर्भगृह याची स्वच्छता मंदिर व्यवस्थापन समिती आणि स्थानिक भाविकांच्या सहभागातून करण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत मंदिरावर रोषणाई करण्याबाबत संबंधित मंदिर ट्रस्टी आणि व्यवस्थापन समिती सदस्य यांना प्रभाग क्षेत्र कार्यालयातून सूचित करण्यात आले.
गेल्या तीन दिवसात महापालिका परिसरातील मुख्य ४३ मंदिरांपैकी २२ मंदिर परिसर आणि मंदिराकडे जाणारे पोहोच रस्ते याची सफाई महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे. या स्वच्छ तीर्थ अभियानामध्ये ट्रीपल आर केंद्रे स्थापित केली जाणार आहेत. या मंदिरामध्ये पूजा स्वरूप येणारे निर्माल्य आणि वस्तूंचे संकलन केले जाणार आहे. मंदिर परिसरात निर्माल्य कलशांची व्यवस्था, प्लॅस्टिक बंदी आणि मंदिर परिसर स्वच्छता याविषयी जनजागृती करण्यात येईल. प्रभाग क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, माजी नगरसेवक, नागरिक, शाळा- महाविद्यालयांमधील विद्यार्थी, सेवाभावी संस्था, महिला बचत गट यांनाही यामध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे. मोहिमेच्या कालावधीनंतर सुद्धा सर्व मंदिरे आणि धार्मिक स्थळांचे ठिकाणी स्वच्छता करण्यात येणार असून सदर जबाबदारी सर्व सहाय्यक आयुक्त आणि स्वच्छता अधिका-यांवर निश्चित करण्यात आली आहे.