कल्याण - 27 गावांमध्ये केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्याची देयके (पाणी बिल) कल्याण डोंबिवली महापालिकेकडून अदा न करण्यात आल्याने एमआयडीसीने या गावातील पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात 27 गावांतील नागरिकांवर पाणी कपातीची टांगती तलवार कायम आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 27 गावांना दररोज 48 नलजोडण्याद्वारे 78 दशलक्ष लिटर एवढा पाणी पुरवठा केला जातो. त्यासाठी दर महिन्याला केडीएमसीकडून 1 कोटी 90 लाख रुपये मासिक देयक प्राप्त होणे अपेक्षित आहे. या देयकांचा भरणा करण्यासाठी वारंवार विनंती करूनही गेल्या वर्षभरापासून केडीएमसीने ती रक्कम न भरल्याचे एमआयडीसीने केडीएमसीला पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. जानेवारी 2021 पर्यंत ही एकूण थकबाकीची रक्कम तब्बल 422 कोटींच्या घरात गेली आहे. एमआयडीसीचे अधिकारी संजय ननावरे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून थकबाकीबाबत केडीएमसीला पत्र दिल्याचेही लोकमतशी बोलताना सांगितले.
एकूण थकबाकीपैकी निव्वळ थकबाकी 101 कोटी असून 235 कोटींहून अधिक विलंब शुल्काची रक्कम आहे. तर फेब्रुवारी 2020 नंतर केडीएमसीकडून मासिक देयके अदा करण्यात आलेली नाही.