कल्याण-लाईटहाऊस या उपक्रम प्रशिक्षणाचा लाभ युवा पिढी आणि महिलांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड़ यांनी आज केले. महापालिका, आरबीएल बँक, जीटीटी फाउंडेशन आणि लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंबिवली येथे लाईट हाऊसच्या उद्घाटन प्रसंगी आयुक्त यांनी उपरोक्त आवाहन केले.
लाईट हाऊस म्हणजे दिशा दाखविणारा उपक्रम, सर्वजण स्वावलंबी झाले तर, देश विकसित होईल. लाईटहाऊसमधील या प्रशिक्षणाच्या सुविधेचा फायदा घेवुन आयुष्यात पुढे मार्गक्रमण करावे, असे मार्गदर्शन आयुक्तांनी उपस्थित विद्यार्थी वर्गास केले. लाईटहाऊस कम्युनिटीचे अध्यक्ष डॉ. गणेश नटराजन, आरबीएल बॅंकेचे उपाध्यक्ष सुमित चौहान आणि जीटीटी फाउंडेशनच्या विश्वस्त डॉ.उमा गणेश यांची समयोचित भाषणे यावेळी झाली. लाईटहाऊस प्रकल्पासाठी महपालिकेने सुमारे २७०० चौरस फूटाची सर्व सुविंधायुक्त इमारत आंबिवली येथे उभारली आहे. यासाठी आरबीएल बँकेकडून अर्थसहाय्य लाभले आहे. आंबिवली येथील या लाईट हाऊस केंद्रात एसी, फ्रिज रिपेरिंग, ऑफिस एक्झिक्यूटिव्ह, अकाउंट एक्झिक्यूटिव्ह, ब्युटी पार्लर, ग्राफिक डिझाइनिंग, डिजिटल मार्केटिंग, इलेक्ट्रिशन, मोबाईल रिपेरिंग, फॅशन डिझायनिंग, वेब डेव्हलपमेंट, हार्डवेअर नेटवर्किंग, ऑटो कॅड, नर्सिंग असिस्टंट, रिटेल सेल्स एक्झिक्यूटिव्ह तसेच संगणक साक्षरता आदी. विविध प्रकारचे कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते.