कल्याण : पाचवीपर्यंत ग्रामीण भागात शिक्षण झाले तरी आज वाचनसंस्कृती रुजविण्यात मला लाख मोलाचा आनंद मिळतो. एखादा लहान मुलगा जेव्हा मी दिलेल्या पुस्तकातील कविता पाठ करतो. तेव्हा मी धन्य होते. पालकांनी मुलांना पुस्तक वाचनाची गोडी लावावी. वाचन संस्काराने घर आनंदीत राहतं असा मोलाचा संदेश पुस्तकाच्या आई भीमाबाई संपत जोंधळे यांनी येथे दिला.
सार्वजनिक वाचनालय, कल्याण आणि केडीएमसी यांच्या संयुक्त विद्यमाने पु. भा.भावे व्याख्यानमालेअंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या कलागुणांना वाव देणारा ‘जल्लोष महिलांचा’ हा सप्तरंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या खाद्य संस्कृतीत वाचन चळवळीच्या प्रणेत्या भीमाबाई जोंधळे उपस्थित होत्या. त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से त्यांनी उपस्थित महिलांना सांगितले. त्यांनी केलेल्या महिलांच्या कलागुणांच्या कौतुकामुळे महिलांचा उत्साह द्विगुणीत झाला. महिलांनी भारुड, लावणी नृत्य, अभिवाचन, एकपात्री अभिनय, काव्य वाचन आदी कलागुणांचे सादरीकरण केले. कार्यक्रम प्रसंगी वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर, चिटणीस आशा जोशी, कार्यकारिणी सदस्य अमिता कुकडे, निलिमा नरेगलकर, अरविंद शिंपी, ग्रंथसेविका आणि महिला वर्ग उपस्थित होता.