लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : शहाड येथील सेंच्युरी रेयॉन कारखान्यातील टँकरच्या स्फोटाप्रकरणीउल्हासनगर पोलिस ठाण्यात सेंच्युरी रेयॉन कंपनीचे प्रशासन तसेच स्फोट झालेल्या टँकर चालक-मालकावर सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक फुलपगारे चौकशी करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प क्रमांक १, शहाड परिसरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीत टँकरचा स्फोट होऊन चार जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. चालक व मालकाने निष्काळजीपणे कार्बनडाय सल्फर द्रव रूपात भरण्यासाठी टँकर आणला होता. तसेच कंपनी प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून टँकरची कोणतीही तपासणी न करता कार्बनडाय सल्फर भरण्याचा प्रयत्न करत असताना स्फोट झाला. यामध्ये टँकरचालक पवनकुमार यादव-आसरे, कंपनीचे कर्मचारी शैलेश यादव, राजेश श्रीवास्तव, हेल्पर अनंता डिंगोरे यांचा जागीच मृत्यू झाला. टँकरचा स्फोट एवढा भयानक होता की, शहाड परिसरात हादरे बसले. मृत्यू झालेल्या कामगारांच्या शरीराचे तुकडे झाले होते.
मृतदेहांची ओळख पटविण्यात उशीरस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या शरीराचे तुकडे झाले होते. मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांची ओळख पटविण्यात कंपनी प्रशासन व पोलिसांचा वेळ गेला. स्फोटाची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती कंपनी प्रशासनाच्या वतीने जनसंपर्क अधिकारी मेहुल ललका यांनी दिली.