- मयुरी चव्हाण
कल्याण: कल्याण डोंबिवलीतील ग्रामीण भाग, दिवा व इतर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. याचा फायदा पाणी माफिया घेत असून उन्हाळ्यात या माफियांची चांगलीच चांदी होताना दिसत आहे. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई अधिक तीव्रतेने जाणवत असल्याने कोरोनाच्या संकटातही जास्तीचे पाणी नागरिकांना विकत घ्यावे लागत आहे.उन्हाळयाच्या पार्श्वभूमीवर टँकरच्या दरात काहीशी वाढ झाली असून आगामी काळात या दरात दुपटीने व तिपटीने वाढ होईल यात काही शंका नाही. मात्र पाणी टंचाई असतानाही बांधकाम व्यावसायिक आणि टँकरमाफियांना मुबलक पाणी कसे काय उपलब्ध होते? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 27 गाव व 14 गावात पाण्यामुळे अनेक मोर्चे निघाले. दिव्यात तर अनेक सोसायट्यांच्या बाहेर पाणी विकत मिळेल अशा आशयाचे पत्रकही लावण्यात आले आहेत. दिव्यात 90 टक्के नागरिक हे पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहे.एमआयडीसीच्या पाईपलाईनमधून चोरून तसेच नदी, खाडी येथील पाणी उपसून त्यावर कोणतीही प्रक्रिया न करता हे पाणी नागरिकांना विकले जात आहे. उन्हाळ्याला सुरवात झाली असून टँकर माफियाही सज्ज झाले आहेत.
निवडणूक काळात मतदार राजाला अनेक प्रलोभने दाखविली जातात. त्यातच ग्रामीण भागात पाण्याचा मुद्दा नेहमीच तापलेला असतो. त्यामुळे ऐन निवडणूकीच्या काळात पाण्याचा मुद्दा थंड करुन मतदारांना खुश करण्यासाठी " मोफत टँकर " पुरविण्याचे पद्धशीरपणे प्रयोजन देखील राजकीय पक्षांकडून केले जाते.
सद्यस्थिती
दिवा -
दिव्यामध्ये 500 लिटर पाण्यासाठी 250 तर 1000 लिटर पाण्यासाठी नागरिकांना 1600 रुपये मोजावे लागत आहे. एप्रिल महिन्यात हेच दर दुपटीने वाढतात. दिवसाला सुमारे 150 ते 200 टँकरने पाणीपुरवठा या भागाला होत आहे.
27 गाव -
एमआयडीसीकडून 27 गावांना दररोज 78 दशलक्ष इतका पाणीपुरवठा केला जातो. सध्या या परिसरात पाणी कपातीचे संकट असून अनेकवेळा कमी दाबाने पाणी येत असल्याने येथील नागरिकांनाही खाजगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.
14 गाव -
ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली शहरांना लागून असलेल्या या 14 गावांमध्ये बोरिंगच्या खाऱ्या पाण्यावर नागरिकांना अवलंबून राहावे लागत आहेत . वापरण्यासाठी टँकरचे पाणी आणि पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या बाटल्यांमध्ये पाणी विकण्यासाठी गाड्या या भागत फिरकत असतात.
दिव्यात पाणी प्रश्न गंभीर आहे. नागरिकांना दोन ते तीन दिवसाआड पाणी येत. नागरिकांना पाणी मिळत नसले तरी टँकर ने पाणी विक्री करणाऱ्यांना मात्र नियमित पाणी मिळत. पाणी माफिया, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात असलेल्या अभद्र युतीमुळे दिवेकारांचे पाण्यासाठी हाल सुरू आहेत.- अँड.आदेश भगत ,अध्यक्ष, भाजपा दिवा.