कल्याण : कल्याण लोकसभा मतदार संघातील कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील गावांमध्ये नळ पाणी पुरवठा योजना लागू केली जाणार आहे. त्यासाठी ३८ कोटी ६० लाख रुपयांचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहेत. या योजनेकरीता कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला होता.
कल्याण तालुक्यातील पोसरी, शेलारपाडा, चिरड, पाली, म्हारळ, वरप कांबा तसेच अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी, मांगरुळ, खरड आणि खोणी या गावात जल जीवन मिशनच्या माध्यमातून स्वतंत्र पाणी पुरवठा योजना राबविली जाणार आहे. या परिसरात नवे गृह निर्माण प्रकल्प आणि कंपन्या गुंतणूक करीत आहे. भविष्याचा विचार करुन नळपाणी पुरवठा योजना राबविली जाणार असून त्याचा फायदा संबंधित गावांना मिळणार आहे.
जल जीवन मिशनच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातून कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील ३९ गावांमध्ये पाणी पुरवठा योजना राबविण्याकरीता ४१ कोटी ६२ लाख रुपये खचाच्या रकमेस अंदाजपत्रकात मंजूरी देण्यात आली आहे. त्यापैकी नेवाळी, मांगरुळ, खरड या गावांतील पाणी पुरवठा योजनेचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यासाठी २२ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
पोसरी, शेलारपाडा, चिरड, पाळी या गावांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी पाच कोटीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या कामांची सर्व प्रक्रिया जवळपास पूर्ण करण्यात आली आहे. येत्या महिन्याभरात त्याला अंतिम मंजूरी दिली जाईल, अशी माहिती खासदार शिंदे यांनी दिली आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याची आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर खोणी गावातील पाणी पुरवठा योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यासाठी एक कोटी २० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
कल्याण तालुक्यातील म्हारळ, वरप, कांबा या कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या गावांमध्ये स्वतंत्र पाणी पुरवठा योजना राबविली जाणार आहे. त्याकरीता १० कोटी ४० लाख रुपयांचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. त्याचा सविस्तर अहवाल तयार असून जलकुंभ व अन्य गोष्टींसाठी जागेची पाहणी केली जात आहे. या गावांना एमआयडीकडून पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे.