- प्रशांत माने डोंबिवली - औरंगजेब क्रूर नव्हता या आ. अबू आझमींच्या वक्तव्याचा शिंदेसेनेच्या वतीने मंगळवारी डोंबिवलीत निषेध करण्यात आला. बुलडोझरखाली आझमींची प्रतिमा चिरडत त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिंदेसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर दुमदूमून टाकला होता.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचा देखील युवासेनेच्या वतीने यावेळी निषेध करण्यात आला. या हत्येचा सूत्रधार आरोपी वाल्मिक कराड याचा प्रतिकात्मक पुतळा बनवून त्याची धिंड काढत त्याला फाशी देण्यात आली. कराड हा वाल्मिकी नाही तर वाल्या राक्षस आहे आणि अशा राक्षसाला महाराष्ट्र त्याची जागा दाखवणार. त्याला फाशीच व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
डोंबिवली शहर शाखेच्या वतीने छेडलेल्या या दोन्ही आंदोलनामध्ये उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, युवासेना जिल्हा अध्यक्ष जितेन पाटील, राहुल म्हात्रे, संतोष चव्हाण, सागर जेधे, बंडू पाटील, सागर दुबे, अनमोल म्हात्रे, लता पाटील, शितल लोके यांसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.