डोंबिवली : विनातिकीट, नियमानुसार तिकीट अथवा पास न काढता प्रवास करणाऱ्या ५ हजार ११९ महिला प्रवाशांना मध्य रेल्वेच्या ‘तेजस्विनी’ या महिला टीसींच्या पथकाने दणका दिला आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांत केलेल्या कारवाईत या पथकाने या फुकट्या प्रवाशांकडून १३ लाख १८ हजार रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.महिलांच्या डब्यातून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चाप लावण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात महिला टीसींच्या तेजस्विनी पथकाची १७ ऑगस्ट, २००१ला स्थापना करण्यात आली आहे. या पथकाने मागील वर्षी फुकट्या प्रवाशांकडून दोन कोटी ७५ लाख रुपयांच्या दंडवसूल केला होता, तर यंदा आतापर्यंत ३ कोटी ४३ लाखांचा दंडवसूल केला असून, सुमारे ६८ लाख रुपये जास्तीचे वसूल केले आहेत. मागील वर्षी एक लाख १७ हजार केसच्या तुलनेत या वर्षी एक लाख २४ हजार केसची नोंद केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सात हजार जास्तीच्या केस दाखल केल्या आहेत.तेजस्विनी पथकाकडून केल्या जाणाऱ्या तिकीट तपासणीमुळे गेल्या काही वर्षांत अतिरिक्त भाड्याच्या उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे.
भिकाऱ्यांचा त्रास कमीतेजस्विनी पथकाच्या कारवाईमुळे महिलांच्या डब्यांमध्ये फेरीवाले, भिकारी इत्यादींमुळे होणारा त्रास कमी झाल्याचा दावा रेल्वेने केला. क्रीडा क्षेत्राची पार्श्वभूमी असलेल्या अनेक महिला तिकीट तपासनीस कर्मचारी या पथकात आहेत. त्या व्यावसायिक, तसेच क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट प्रदर्शन करत असल्याचे सांगण्यात आले.