कल्याण : मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी भाजपाच्यावतीने शंखानाद आंदोलन सुरू असताना सोमवारी कल्याण पूर्वत देखील जरी मरी तिसाई मंदिराबाहेर भाजपा आध्यात्मिक आघाडीतर्फे शंख, टाळ, मृदंग वाजवत मंदिर उघडण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली. यावेळी अध्यात्मिक व धार्मिक भावना चिरडण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप भाजपा आध्यात्मिक आघाडीकडून करण्यात आला. तसेच अध्यात्मिक आघाडीच्या कार्यकर्त्यांसह वारकऱ्यांनी थेट मंदिरात प्रवेश केला.
महाराष्ट्र वगळता देशातील अन्य राज्यांतील धार्मिक स्थळे खुली करण्यात आली आहेत. संताची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ठाकरे सरकारने बार सुरू आणि मंदिर-धार्मिक स्थळे बंद असे काळे चित्र उभ केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी मंदिराचे दार उघडत शंखनाद व टाळ मृदंगाच्या गजरात देवीची आणि प्रभू श्रीरामचंद्रांची आरती केली.
वारकरी संप्रदाय आणि धार्मीक संस्थामुळेच कोरोना पसरतो हे बिंबवून समाजाला दडपण्याचा हा हीन प्रयत्न सरकारकडून केला जातोय.हजारोंच्या गर्दीत मंत्री लग्नाला हजेरी लावतात तेव्हा कोरोना पसरत नाही का? असा आरोपयावेळी ह. भ. प. चंद्रभान सांगळे महाराज यांनी केला. यावेळी माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांच्यासह अनेक भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.