सदानंद नाईकलोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : मध्यवर्ती रुग्णालयात ममता निकम या महिलेची कमी दिवसांत प्रसूती होऊन ५०० ग्रॅम वजनाच्या बाळाला जन्म दिला होता. डॉक्टर व नर्सनी नवजात शिशुकक्षात बाळावर तीन महिने यशस्वी उपचार करून बुधवारी बाळाला रुग्णालयातून सुटी दिली. आता बाळाचे वजन दोन किलो असून तब्येत सुदृढ झाल्याची माहिती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांनी दिली.
उल्हासनगर शेजारील अंबरनाथ जुना गायकवाड पाडा येथील ममता निकम या गर्भवती महिलेच्या पोटात दुखत असल्याने, ती उपचार करण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी मध्यवर्ती रुग्णालयात आली. सहा महिन्यांची गर्भवती असणाऱ्या ममता हिने उपचारादरम्यान कमी दिवसांच्या बाळाला जन्म दिला. त्यावेळी बाळाचे वजन अवघे ५०० ग्रॅम असल्याने, कमी वजनाच्या बाळाच्या तब्येतीबाबत कुटुंबासह डॉक्टर्स व नर्स यांच्या समोर यक्षप्रश्न उभा ठाकला होता. मात्र, आईला मुलाविषयी असलेले प्रेम व लळा बघून नवजात शिशू कक्षातील डॉ. वसंतराव मोरे, डॉ. वैशाली पवार, डॉ. किरण बनसोडे, डॉ. आझम खान, डॉ. पूजा यादव, नर्स जयश्री शिंदे, गौरी केलसीकर आदींनी सतत तीन महिने या बाळाला तळहातावरील फोडासारखे जपले. जणू या बाळाचा पुनर्जन्म झाला. उपचारादरम्यान बाळाच्या डोळ्याला संसर्ग झाल्याने, त्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
आईच्या जिद्दीला सलामममता निकम या महिलेची सहाव्या महिन्यात प्रसूती होऊन अवघ्या ५०० ग्रॅम वजनाच्या बाळाला जन्म दिल्याने, तिच्या कुटुंबाने बाळाच्या जगण्याची आशा सोडली होती. मात्र, ममता यांनी जिद्द सोडली नाही. आईच्या जिद्दीला डॉक्टर व नर्सनी सलाम ठोकून उपचार केले.
असुविधांवर मातमध्यवर्ती रुग्णालयातील नवजात शिशू कक्षाची क्षमता १० बालकांची असून व्हेंटिलेटरची सुविधा नाही. अशा अपुऱ्या सुविधांवर मात करीत डॉक्टरांनी बाळाची प्रकृती ठणठणीत करून घरी सुखरूप पाठविले आहे.
कक्षाची क्षमता १०, पण...
मध्यवर्ती जिल्हा रुग्णालयात कर्जत, कसारा, मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, बदलापूर व ग्रामीण परिसरातून शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज १५०० पेक्षा जास्त रुग्णांची नोंदणी होत असून वर्षाला सहा हजारांपेक्षा जास्त बाळांचा जन्म होतो. २०२ बेडची क्षमता असलेल्या रुग्णालयात ३०० पेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत. नवजात शिशू कक्षाची क्षमता १० बालकांची असताना सरासरी १५ पेक्षा जास्त मुलांवर उपचार होत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांनी दिली.