कल्याण- कल्याणडोंबिवली महापालिकेच्या आयुक्त पदाची सूत्रे नवे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी आज स्विकारली आहे. महापालिका हद्दीत शहर स्वच्छता आणि वाहतूकीच्या सोयी सुविधा सुधारण्यावर भर दिला जाणार असल्याचा मानस आयुक्त दांगडे यांनी व्यक्त केला आहे.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज सकाळ नवे आयुक्त दांगडे यांची भेट घेतली. त्यांच्याकडे आयुक्त पदाचा पदभार सोपविला. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.आयुक्त दांडगे यांनी सांगितले की, महसूल खात्यात त्यांनी यापूर्वी काम केले आहे. त्यांना महापालिकेचा कारभार पाहण्याची संधी प्रथमच मिळाली आहे. त्यामुळे महापालिकेचे कामकाज आणि संबंधित सर्व विभागात काम कसे काय चालते यांची प्राथमिक माहिती त्यांनी आज विविध विभाग प्रमुखांकडून आहे. आठवडय़ा भरात सर्व खात्यांची बैठक घेतली जाणार आहे. महापालिका हद्दीत कोणते विकास प्रकल्प राबविले जात आहे. त्यापैकी किती प्रगतीपथावर आहे. किती रखडले आहे याची माहिती घेतली जाईल. यापूर्वी कल्याण डोंबिवली शहरात आलो होतो. त्यावेळी स्मार्ट सिटीची कामे इतकी झालेली नव्हती.
आत्ता त्यात प्रगती पाहावयास मिळत आहे. महसूल खात्याचा अनुभव असल्याने महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करणार. महापालिकेचा आस्थापना खर्च 45 टक्के आहे. ही बाब दांगडे यांनी अधोरेखीत केली. महापालिका हद्दीत बेकायदा बांधकामांचाही प्रश्न आहे. त्यावरही लक्ष ठेवले जाणार आहे. बेकायदा बांधकामे पाडण्याची या आधीच्या आयुक्तांची मोहीम सुरुच ठेवली जाणार आहे.
याशिवाय घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा आणि मालमत्ता कराची वसूली या महत्वाच्या बाबींकडे लक्ष देऊन नागरीकांना जास्तीत जास्त चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर दिला जाणार असल्याचे दांगडे यांनी सांगितले. सरकारच्या पंधराव्या वित्त आयोगाकडून प्राप्त झालेल्या निधीतून महापालिका हद्दीत 67 हेल्थ वेलनेस सेंटर उभारली जाणार आहे. ही सेंटर कार्यान्वीत झाल्यास महापालिकेची आरोग्य यंत्रणा अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे. त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे दांगडे यांनी स्पष्ट केले.