डोंबिवली - महावितरणमधील कर्मचारी, अधिकारी व अभियंत्यांच्या विविध संघटना बुधवारी मध्यरात्रीपासून ७२ तासांच्या संपावर जात आहेत. या संपाच्या पार्श्वभूमीवर कल्याण परिमंडलातील ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक तयारी मुख्य अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. मुख्य कार्यालयाच्या निर्देशानुसार परिमंडलातील कल्याण एक आणि दोन, वसई व पालघर या चारही मंडल कार्यालयात संप काळासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
संपाच्या कालावधीत वीजपुरवठा बाधित होणे, अपघात, वीज यंत्रणेचे नुकसान अथवा अपघात यासंदर्भात आपापल्या कार्यक्षेत्रातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून माहिती देण्याचे व सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत असल्याची माहिती जनसंपर्क विभागाने मंगळवारी जाहीर केली. कल्याण पश्चिम आणि पूर्व, डोंबिवली या विभागाचा समावेश असलेल्या कल्याण मंडल कार्यालय एकसाठी नियंत्रण कक्षाचे ८८७९६२६२३८, आणि ८८७९६२६१३९ हे मोबाइल क्रमांक जाहीर केले आहेत. तर उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा, मुरबाड, शहापूर आदी भागांचा समावेश असलेल्या कल्याण मंडल कार्यालय दोनसाठी नियंत्रण कक्षाचे ८८७९७६२६९६९ आणि ९००४६९६५११ हे मोबाईल क्रमांक आहेत. आहेत. कर्मचारी, अधिकारी, अभियंते तसेच कंत्राटी कामगार या संपात सहभागी होत आहेत. त्यामुळे या संपात नसणारे कर्मचारी, अभियंते, अधिकारी याशिवाय देखभाल-दुरुस्तीसाठीच्या एजन्सीसह इतर कंत्राटदारांचे कामगार, सेवानिवृत्त कर्मचारी व प्रशिक्षणार्थी यांच्या मदतीने संप काळात वीजपुरवठा अबाधित ठेवण्यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे. नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक संप कालावधीत चोवीस तास सुरू राहणार आहेत. वीजेसंदर्भातील तक्रारी व माहिती देण्यासाठी आपापल्या कार्यक्षेत्रातील नियंत्रण कक्षाशी संपर्क करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.