लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : दिवा स्थानकात बुधवारी खोपोली-सीएसएमटी जलद लोकल उशिरा आल्याने गर्दीमुळे तसेच लोकल निघत असल्याचे दिसताच एक महिला मोटरमनच्या केबिनमध्ये चढली. तिला नंतर उतरून महिलांच्या डब्यात बसविण्यात आले, मात्र संबंधित महिलेसह दिव्यातील चौघा महिलांवर रेल्वेने गुन्हे दाखल केल्याने प्रवासी संघटनेने संताप व्यक्त केला आहे.
ऐनवेळी या लोकलचा प्लॅटफॉर्म बदलल्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. अशातच काही महिलांनी बाजूला असणाऱ्या मोटरमन केबिनमधील मोटरमनला विनंती केली की, सर्व महिलांना आतमध्ये व्यवस्थित चढू द्यावे आणि त्यानंतरच ट्रेन सुरू करावी. परंतु, मोटरमनने लोकल सुरू केल्याने एक महिला त्या मोटरमन केबिनमध्ये चढली. ट्रेन सुरू झाल्यानंतर लगेच ट्रेन पुन्हा थांबवण्यात आली. केबिनमध्ये घुसलेल्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आदेश भगत यांनी दिली.
खाली उतरण्यास नकारसंबंधित महिलेला मोटरमनच्या केबिनमधून उतरवण्यास सांगितले असता तिने पहिल्यांदा नकार दिला. दहा मिनिटे ट्रेन थांबल्यानंतर महिलेला उतरून बाजूलाच असलेल्या महिला डब्यामध्ये बसवण्यात आले. त्यानंतर त्या महिला व अन्य चार महिलांना पोलिसांकडून कुर्ला स्थानकातून दिवा रेल्वे सुरक्षा बलाच्या चौकीत आणण्यात आले.