कल्याण- ईद ए मिलाद आणि गणेश विसर्जन अनंत चतुर्थी एकाच दिवशी येत असल्याने ईद ए मिलादची सुट्टी २८ सप्टेंबर ऐवजी २९ सप्टेंबर रोजी देण्यात यावी अशी मागणी कल्याण मजलीसे मुशावरीन मशिद औकाफचे अध्यक्ष शरफूद्दीन कर्ते यांनी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे केली आहे.
ईद ए मिलादच्या निमित्ताने मुंबईसह अन्य उपनगरात मुस्लिम बांधवांकडून मोठी मिरवणूक काढण्यात येते. ईद मिलाद आणि अनंद चतुर्थी एकाच दिवशी २८ सप्टेंबर रोजी आहे. अनंत चतुर्थीच्या दिवशी दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन केले जाते. या दिवशी शहरातील विविध भागातील प्रमुख रस्त्यांवरुन गणेश विसर्जनाची मिरवणूक काढली जाईल. त्याच दिवशी शहरातून ईद ए मिलादची मिरवणूक काढल्यास त्याचा ताण पोलिस बंदोवस्ताला असलेल्या पोलिस यंत्रणेवर येऊ शकतो. सामाजिक सलोखा टिकून राहावा. यासाठी मुस्लीम बांधवांनी सामाजिक सामंजस्य दाखवून ईद ए मिलाद निमित्त मुंबई व अन्य उपनगरातून काढली जाणारी मिरवणूक ही २९ सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानिमित्त ईद ए मिलादची सरकारी सुट्टी जिल्हाधिकारी कार्यालयाने २९ सप्टेंबर रोजी द्यावी अशी मागणी अध्यक्ष कर्ते यांच्या वतीने करण्यात आली आहे.
कर्ते यांच्या मजलिसे मुशावरीन मशिद औकाफ अंतर्गत शहरातील सर्व मशिदीचा कारभार पाहिला जातो. त्यांच्याशी विचारविनीमय करुनच ईद ए मिलादची मिरवणूक २८ सप्टेंबर ऐवजी २९ सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेतला आहे.