सचिन सागरे
कल्याण : पश्चिमेतील नूतन विद्यालय. कल्याणच्या सन १९८०-८१ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शनिवारी उत्साहात साजरा झाला. शाळेने दिलेली शिकवण, केलेले संस्कार, जगाला निधड्या छातीने सामोरे जाण्यासाठी रुजवलेली सकारात्मक इच्छाशक्ती ही शिदोरी घेऊन आतापर्यंत यशस्वीरित्या केलेल्या वाटचालीबद्दल गुरुजनांप्रती तसेच शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोबत शिकणाऱ्या तत्कालीन सवंगड्यांसोबतचे मैत्रीचे
धागे अधिक घट्ट करण्यासाठी तब्बल ४१ वर्षानंतर नूतन विद्यालय कल्याण येथील माजी विद्यार्थी सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकत्र आले.स्नेहसंमेलनात बहुतांश विद्यार्थी हे त्यांच्या कुटुंबीयांसह सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, नूतन विद्यालयात शिक्षण देणारे गुरुजन सुद्धा या कार्यक्रमास हजर होते. शाळेचे माजी प्राचार्य वसंत पुरोहित यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गुरुजनांचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सर्वांनी आपल्या आयुष्याच्या जडण-घडणीचा परिचय मित्रांना सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. बहुतांश विद्यार्थी शिक्षक, प्राध्यापक, इंजिनियर्स, रेल्वे ,मर्चंट नेव्ही, एस .टी. महामंडळ, पोलीस अधिकारी, काही उद्योजक तर काही बँकेत होते. सदर कार्यक्रमास राज्यातून परराज्यातून व विदेशातून विद्यार्थ्यांनी येऊन उपस्थिती लावली. हे स्नेहसंमेलन एका रिसोर्टमध्ये पार पडले. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचलन वैदेही साठे व सुदेश उंबरे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून माजी विद्यार्थी सुशीलकुमार भोसले यांनी ऑस्ट्रेलिया येथून येऊन कार्यक्रमास विशेष हजेरी लावली. तसेच माजी विद्यार्थी राष्ट्रपती पोलीस पदक विजेते सुनील चव्हाणके यांनी उपस्थिती लावली.