मुरलीधर भवार, डोंबिवली: गुन्हा दाखल करणे सध्याच्या सरकारला सोपे आहे, वेगवेगळ्या पद्धतीने अनेक प्रकारचे गुन्हे विरोधी पक्षांवर दाखल करायचे आणि स्वतःच्या हैवानांना मात्र मोकळे सोडायचे असे सरकारचे धोरण आहे. वडेट्टीवारांसारखा जबाबदार व्यक्ती एका महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलतो त्याची सखोल चौकशी करण्याचे धाडस सरकारने दाखवावे अशी प्रतिक्रिया उद्धव सेनेचे खासदार विनायक राऊत यांनी वडेट्टीवार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत दिली आहे.
डोंबिवली स्टेशन परिसरात उद्धव सेनेच्या कार्यालयाचे उद्घाटन आज सायंकाळी खासदार राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी उपरोक्त सवाल उपस्थित केला. राऊत यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आमच्यासोबत यावे असे विधान केले होते. या विधानाबाबत खासदार राऊत यांनी सांगितले की, एखाद वेळेस पाकिस्तानचे पंतप्रधान लाचार होऊन तुमच्याकडे येतील. पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे भारत मातेच्या रक्षणासाठी लढत आहेत. ते लाचारी स्वीकारणार नाहीत ,स्वाभिमान काय असतो हे त्यांनी दाखवून दिले आहे.