कल्याण : एम्फिसिमेटस पायलोनेफ्रायटिस या आजाराचा सामना करणाऱ्या, रक्तवाहिन्यांमध्ये गॅस होणे व त्याचबरोबर अनेक अवयव निकामी होण्याच्या समस्येशी झुंजणाऱ्या एका ३२ वर्षीय महिला रुग्णाची स्थिती २४ तासांमध्ये स्थिर करण्यात एका खाजगी रुग्णालयातील पथकाने यश मिळविले. या रुग्णालयातील कन्सल्टन्ट - युरोलॉजी डॉ. प्रदीप व्यवहारे आणि कन्सल्टन्ट- इन्टेन्सिव्ह केअर डॉ. संदीप पाटील या तज्ज्ञ चिकित्सकांनी आपल्या टीमच्या साथीने रुग्णावर उपचार केले.
एका विमा कंपनीमध्ये काम करणाऱ्या वृषाली मथुरे (३२, रा. डोंबिवली) कामानिमित्त जिम कॉर्बेट येथे दौऱ्यावर गेल्या होत्या. यावेळी, त्यांना पहिल्यांदा पोटामध्ये थोडे दुखत असल्याचे जाणवले. मात्र घरी परतल्यावर या वेदना असह्य झाल्या. त्यांना डाव्या बगलेत वेदना होत असल्याचे आणि उलट्या होत असल्याचे पूर्वनिरीक्षण नोंदविण्यात आले होते. त्यांचा रक्तदाब अतिशय खाली गेला होता, अस्वस्थता जाणवत होती, साखरेची पातळी वाढली होती आणि पहिल्यांदाच डायबेटिसचे निदान झाले होते. त्यांचे सिटी स्कॅन करण्यात आले आणि त्यातून त्यांना ‘एम्फिसिमेटस पायलोनेफ्रायटिस’ मूत्रपिंडाच्या उतींना झालेला उतींचा ऱ्हास करणारा संसर्ग झाल्याचे आणि त्यासोबतच मूत्रपिंडाच्या नसांमध्ये वायू असल्याचे निदान झाले.
शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि शस्त्रक्रियेनंतर २४ तासांतच रुग्णाची प्रकृती स्थिर झाली. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली. त्यांचा रक्तदाब, क्रिएटाइन, प्लेटलेट आणि साखरेची पातळी पूर्ववत झाली, डायलिसिसची गरज भासली नाही.
या आजारामध्ये, मूत्रपिंडाचा प्रत्यक्ष कार्यरत भाग, ग्रहण यंत्रणा किंवा मूत्रपिंडाच्या परिक्षेत्रामध्ये गॅसेस तयार होतात. ज्यामुळे संसर्गजन्य उतींचा मृत्यू उद्भवतो. हे प्रामुख्याने मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे घडते आणि अनिर्बंध डायबेटिस असलेल्या रुग्णांमध्ये दिसून येत असल्याचे युरोलॉजी डॉ. प्रदीप व्यवहारे यांनी सांगितले.
रुग्णाची स्थिती स्थिर केल्यानंतर त्यांच्या पॅरेन्किमामध्ये तसेच रक्तवाहिन्यांमध्ये गॅसेस तयार झाल्याचे आमच्या लक्षात आले. यामुळे त्यांची किडनी जवळ-जवळ पूर्णपणे खराब झाली होती. ही एम्फिसिमेटस पायलोनेफ्रायटिसची एक दुर्मिळ स्थिती होती. ज्यात रुग्णाला रक्तवाहिन्याममध्ये गॅस तयार होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी किडनी काढून टाकावी लागली. मात्र, त्यांच्या त्यावेळच्या स्थितीमुळे ही शस्त्रक्रिया गुंतागूंतीची ठरली, तरीही सेप्टिसेमिया आणि मल्टि-ऑर्गन फेल्युअरचे मूळ नष्ट करण्यासाठी ती गरजेची होती असे -इंन्टेन्सिव्ह केअर डॉ. संदीप पाटील यांनी सांगितले.
माझ्या पोटामध्ये तीव्र वेदना होत होत्या, धाप लागत होती आणि आपल्यासोबत काय घडते आहे हे मला समजत नव्हते. माझी तब्येत अधिकाधिक खालावत चालली होती. चटकन झालेले निदान आणि तत्काळ मिळालेले उपचार यामुळे मला नवे जीवनदान मिळाल्याचे रुग्ण वृषाली मथुरे यांनी सांगितले.---