कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने सोमवारी नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत जनजागृतीसाठी साक्षरता दिंडीचे आयोजन केले होते. कल्याण डोंबिवलीतील महापालिका शाळांच्या वतीने काढण्यात आलेल्या या साक्षरता दिंडीत बालगोपाळ विदयार्थी विदयार्थींनींसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.
मा. संचालक (योजना) महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आदेशान्वये महापालिका क्षेत्रातील मनपाच्या सर्व तसेच व्यवस्थापनाच्या मान्यता प्राप्त शाळांच्या वतीने केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रम राबविण्याच्या निमित्ताने आपल्या शाळांच्या जवळपासच्या परिसरात बुधवारच्या आषाढी एकादशीचे औचित्य साधत सोमवारी साक्षरता जनजागृती दिंडीचे आयोजन केले होते. आपल्या शाळेच्या परिसरात एकही असाक्षर राहणार नाही यासाठी बॅनर फलक आणि घोषवाक्यांच्या माध्यमातून साक्षरता जनजागृती करण्यात आली. मांडा येथील केडीएमसीची शाळा क्रमांक ६० संत ज्ञानेश्वर प्राथमिक विदयालय, कल्याण पश्चिमेतील वडवली केडीएमसी शाळा क्रमांक ३४ आणि डोंबिवली पश्चिमेतील कोपरगाव येथील चरू बामा म्हात्रे विदयामंदिर, पुर्वेकडील संत तुलसीदास हिंदी शाळा आणि सयाजीराव गायकवाड शाळा यांसह अन्य शाळांनी आपापल्या परिसरात साक्षरता जनजागृती दिंडीचे आयोजन केले होते. दिंडी काढताना विदयार्थ्यांच्या सुरक्षेबाबतची योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती अशी माहिती शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांनी दिली.