कल्याण - कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात काही दरोडेखोर दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती . या माहितीच्या आधारे अवघ्या तासाभरात पोलिसांनी सापळा रचून चार दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांचे तीन साथीदार पसार झाले आहेत. पोलीस पसार झालेल्या तिघांचा शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आजीम गाझी, अरफात शेख उर्फ काल्या, अन्वर शहा, अरबाज शेख उर्फ बटला अशी आहेत. तर शफिक बगला, अल्ताफ उर्फ कच्ची आणि जिओ हे तीन साथीदार पसार झाले आहेत. हे सर्व सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बाजार समिती परिसरात गुजरातहुन येणाऱ्या धान्य व्यापाऱ्यांच्या वाहनांवर दरोडा घालून लुटण्यासाठी काही दरोडेखोर बाजार समितीच्या परिसरात जमले असल्याची माहिती कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्याची हवालदार सचिन साळवी यांना मिळाली होती . या माहितीच्या आधारे पाेलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग, सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रुपवते ,विनोद कालेकर यांच्या पथकाने बाजार समिती परिसरात सापळा रचला. या ठिकाणी काही इसम संशयास्पद रित्या फिरताना आढळून आले. पोलिसांनी तात्काळ या इसमांवर झडप टाकली. चौघांना ताब्यात घेतले. मात्र यामधील तीन जण पळून जाण्यात यशस्वी झाले .आजीम गाझी, अरफात शेख उर्फ काल्या, अन्वर शहा, अरबाज शेख उर्फ बटला यांना अटक केली आहे. तर शफिक बगला, अल्ताफ उर्फ कच्ची आणि जिओ हे तीन साथीदार पसार झाले. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून तीन धारदार चाकू, नायलॉनची रस्सी, मिरची स्प्रे ,रोकड तसेच एक रिक्षा पोलिसांनी जप्त केली असल्याची माहिती पोलिस अधिकारी विनोद कालेकर यांनी दिली आहे.