डोंबिवली: महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांच्या आदेशानुसार फ प्रभागक्षेत्र परिसरातील जमिन मालक धनंजय शेलार व विकासक अश्विनी ब्रिजराज पांडे, संदिप मोहन डोके, महेश मधुकर लहाने यांनी फ प्रभाग क्षेत्रातील कांचनगाव डोंबिवली पूर्व येथे ७ मजल्याचे अनाधिकृत आर.सी.सी. इमारतीचे बांधकाम केले होते. ते शनिवारी पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आले.
महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार ते बांधकाम महापालिकेने २० नोव्हेंबर रोजी अनाधिकृत घोषित करूनसुध्दा संबंधितांनी बांधकाम सुरू ठेवल्याने २९ डिसेंबरपर्यंत इमारतीच्या भिंती व स्लॅबचे बांधकाम निष्कासित करण्यात आले होते. त्यानंतर महापालिकेचे पोलीस कर्मचारी, टिळकनगर पोलीस स्टेशनचा पोलीस कर्मचारी वर्ग तसेच फ चे बांधकाम उपअभियंता विनयकुमार विसपुते, अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे इतर कर्मचारी यांच्या १५ फेब्रुवारी सदर इमारतीवर पोकलन, जेसीबी ब्रेकर, गॅस कटरचा वापर करून फ प्रभागाचे सहा.आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी निष्कासनाची कारवाई सुरू केली. परंतु त्या इमारतीच्या आजूबाजूला विद्युत हाय टेन्शन वायर असल्याने इमारतीचे दोन मजले ब्रेकर, गॅस कटर व कामगारांच्या सहाय्याने निष्कासित करण्यात आले आणि २२ फेब्रुवारी रोजी हाय रिप जॉ क्रशर मशीन व पोकलन, जेसीबी व कामगारांसह निष्कासन कारवाई सुरू ठेवून इमारतीचे २४ फेब्रुवारी रोजी इमारत पूर्णपणे निष्कासित करण्यात आल्याची माहिती महापालिकेने सोमवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर।केली.